ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वाढल्या मंदिरातील फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 02:11 PM2021-01-08T14:11:09+5:302021-01-08T14:14:23+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी उमदेवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कबुली देण्यासाठी थेट ग्रामदैवताच्या मंदिरात येण्यास सांगितले जात आहे.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी उमदेवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी झालं गेलं सारे विसरून तू मला मदत कर अशी विनंतीही केली जात आहे. त्याला विरोधी उमेदवाराने समर्थन देताच त्याला कबुली देण्यासाठी थेट ग्रामदैवताच्या मंदिरात येण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या काळात मंदिराच्या फेऱ्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज छाननीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या उमेदवारांची निश्चिती झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी अनेक ठिकाणी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र, सारे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या सहकार्याची अपेक्षा केली जात आहे.
रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेने सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा विडा उचलला आहे. हक्काच्या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने ह्यसाम, दाम, दंडह्ण पणाला लावण्याची तयारी ठेवली आहे. निवडणुकीत त्याच-त्याच उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी दिली जात असल्याने नाराजीचा सूर आळवला जात आहे. त्याचाच फायदा उचलण्यासाठी अन्य पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने काही ठिकाणी विद्यमान सदस्यांना उमेदवारी न दिल्याने बंडखोरीची शक्यता अधिक आहे.
शिवसेनेच्या काही सदस्यांनी विरोधी उमेदवारांची मनधरणी करण्यासही सुरुवात केल्याची चर्चा आहे. ह्यझालं गेलं सारे विसरून जा आणि मला मदत करह्ण, अशी विनवणीच उमेदवारांकडून करण्यात येत आहे. विरोधी उमेदवारानेही होला हो देताच ह्यचल मग मंदिरात जाऊन मी तुला साथ देतोय असे सांगह्ण, असा हट्टच धरला जात आहे. उमेदवारांना मंदिरात नेऊन तेथे कबुलीजबाब देण्याची गळ घातली जात आहे. त्यामुळे सध्या मंदिरात जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.
सरपंचपदाची आखणी
सरपंचपदाचे आरक्षण काय पडणार, याची उत्सुकता अनेकांना आहे. आरक्षणाचा पत्ता नसला तरी काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेत. त्यांनी बेरजेचे गणित करत सदस्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी विरोधी गटातील उमेदवारांनाही गळ घातली जात आहे.
पार्ट्या झडू लागल्या
मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसा रात्रीचा प्रचार करण्यावर जोर दिला जात आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या पार्ट्या करून मतदारांना खूश केले जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माजी सदस्यांनी पुढाकार घेतल्याचीही चर्चा रंगत आहे.
छुपा प्रचार
शिवसेनेने काहींचे पत्ते कापल्यानंतर त्यांनी विरोधी गटात शिरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाला उघडउघड विरोध न करता छुपेपणे प्रचार करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे त्याचा फटकाही शिवसेनेला बसण्याची शक्यता अधिक आहे.