खेड स्मशानभूमीत वाढीव लाकूडसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:08+5:302021-05-15T04:30:08+5:30
खेड : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच कोरोनाबळींची संख्या वाढत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत लाकडांचा साठा वाढविण्यात आला आहे. गेल्या १३ ...
खेड : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच कोरोनाबळींची संख्या वाढत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत लाकडांचा साठा वाढविण्यात आला आहे. गेल्या १३ दिवसांत तब्बल २१ जणांवर नगरपरिषद स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोनाबळींच्या वाढत्या संख्येने प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे.
कोरोनाबाधित मृतदेहांवर नगर प्रशासनाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. गेल्या १३ दिवसांत तब्बल २१ जणांचा कोरोनाने मृत्यू
झाला आहे. तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या १२६ वर पोहाेचली आहे. कोरोनाबाधित मृतदेहांवर ग्रामीण भागात अंत्यसंस्कार करण्यास नातेवाइकांसह गावकरी नकार देत असल्याने नगरपरिषद प्रशासन अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडत आहेत.
दिवसात २ ते ३ तर काही वेळा ४ ते ५ कोरोनाबाधित मृतांना अग्नी दिला जात आहे. एका मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यासाठी सुमारे ३०० ते ४०० किलो लाकडांचा साठा आवश्यक असतो. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने स्मशानभूमीत जळावू लाकडांचा साठा वाढविला आहे. मृतदेहांवर स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील मुकादम कृष्णा निकम, अनिल चव्हाण, सुनील जाधव, अरविंद सावंत, स्वप्निल जाधव, शशिकांत पिंपळकर आदी कर्मचारी अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडत आहेत. हे ६ कर्मचारी स्वच्छतेचे दैनंदिन कामकाज करून मृतांना अग्नी देण्याची जबाबदारी निभावत आहेत.
----------------------------------
खेड नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत वाढीव लाकडांचा साठा करण्यात आला आहे.