कोरोनामुळे औषधी वनस्पतींना वाढती मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:35+5:302021-05-08T04:33:35+5:30
मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या भीतीमुळे विविध प्रकारचे काढे तयार करून सेवन करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ...
मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या भीतीमुळे विविध प्रकारचे काढे तयार करून सेवन करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय आवर्जून केले जात आहेत. डॉक्टरांकडे वारंवार जाण्याऐवजी घरगुती इलाजावर भर दिला जात आहे.
कोरोनामध्ये सर्दी, ताप, खोकला काढण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, कफ पातळ होऊन पडण्यासाठी औषधी वनस्पतीच्या पाना-मुळांपासून काढे तयार करण्यात येतात. विविध रोगांवर औषधी वनस्पतीतील गुणधर्मामुळे रामबाण इलाज केला जातो. औषधी वनस्पतींचे महत्त्व कळल्यामुळे लागवडीसाठी कल वाढला आहे. ग्रामीणच नाही, तर शहरी भागात तर गच्चीमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येत आहे.
गतवर्षीपासून कोरोनाचा देशात शिरकाव झाला. औषधी वनस्पतींचे महत्त्व उमगले असून, त्याचा वापरही वाढला आहे. हल्ली कार्यक्रमात फुलांऐवजी रोपे देण्याची पध्दत आहे. त्यातच सर्वाधिक औषधी वनस्पतींची रोपे दिली जात आहेत. औषधी वनस्पतींची मागणी गेल्या काही वर्षांत कमालीची वाढली आहे.
- माधुरी कळंबटे, नर्सरीचालक
आजीबाईच्या बटव्यातून औषधी वनस्पतींचे महत्त्व माहीत असले, तरी कोरोनामुळे वापर सुरू झाला आहे. ग्रामीण भागात परसदारात औषधी वनस्पतींची लागवड आढळते; मात्र शहरातील गच्चीत तर औषधी वनस्पतींची लागवड करून चक्क बाग सजावट केली जात आहे. त्यामुळे खास औषधी वनस्पतींचा खप वाढत आहे.
- अरविंद जाधव, नर्सरीचालक
या पाच रोपांना वाढली मागणी
तुळस : तुळशीच्या पानांचा उपयोग औषधाव्यतिरिक्त तेल निर्मिती करून विविध औषध निर्माण करण्यासाठी होतो. हिवताप, कफज्वरावर तुळस गुणकारी आहे. तुळशीची पाने नित्य सेवन करणे फायदेशीर आहे.
अडुळसा : या वनस्पतीच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी केला जातो. कफ पातळ करणारा, खोकला कमी करणारा, दमा, श्वास इत्यादींवर उपयुक्त आहे. अडुळशाचा रस मधासह दिला जातो. ओली किंवा सुकी पाने, सालीचा उपयोग केला जातो.
गुळवेल : गुळवेल प्रामुख्याने जुलाब व हगवणीवर, पोटातील मुरडा तसेच कृमी यावर गुणकारी आहे. शिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठीसुध्दा त्याचा वापर केला जातो. गुळवेल विशेषत: कावीळ रोगावर लाभदायी असून, त्वचारोगही बरा होतो. गुळवेलीच्या पानांचा तसेच खोडाचा औषधी वनस्पती म्हणून सर्रास वापर केला जातो.
पुदिना : पुदिनामधील तीव्र गंध जो नाकाव्दारे शरीरात जाऊन श्वसन प्रक्रिया सुलभ करते. कफ शरीराबाहेर टाकण्यास उपयुक्त ठरते. पुदिन्यातील अॅन्टी बॅक्टेरियल आणि अॅन्टी इन्फ्लामेंट्री गुणांमुळे श्वसन तंत्र सुलभ होण्यासोबत घशाची सूजही कमी होते.
अश्वगंध : या औषधी वनस्पतीमध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी इंफ्लेमेटरी, अॅंटी स्ट्रेस, अॅन्टी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. या औषधी घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत सुरू होते.