चिपळुणातील १६७ गावांपैकी ३२ गावांत स्वतंत्र विलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:21 AM2021-06-10T04:21:57+5:302021-06-10T04:21:57+5:30
चिपळूण : गृहविलगीकरण बंद केल्यानंतर आता प्रशासनाने गाव स्तरावरच विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. २ हजारांपेक्षा ...
चिपळूण : गृहविलगीकरण बंद केल्यानंतर आता प्रशासनाने गाव स्तरावरच विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. २ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात हे विलगीकरण कक्ष सुरू केले जाणार आहेत. त्यानुसार चिपळूण तालुक्यात १६७ गावांपैकी ३२ गावे या निकषात बसत असून, तेथे ही केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत यातील निम्मे कक्ष सुरू झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. तालुक्याचा विचार करता दोन महिन्यांत २४२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ५९० जण बाधित आहेत. त्यातील २९३ जण घरातच उपचार घेत आहेत. १४ ते १७ दिवस वेगळे राहणे अपेक्षित असताना यातील अनेक जण ५ ते ७ दिवसांतच आपल्याला काहीही होत नाही, लक्षणे नाहीत, असे म्हणत गावभर फिरत आहेत. त्यांना रोखणार कोण, असा प्रश्न असून, ते कोरोनाचा संसर्ग वाढवणारे ‘सुपर स्प्रेडर’ ठरत आहेत. त्यामुळे यापुढे गृहविलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, समाजमंदिरे अशा ठिकाणी हे कक्ष उभारले जात आहेत. तेथे वीज, पाणी, शौचालये आदी भौतिक सुविधा उपलब्ध केल्या असून, त्यासाठी लोकसहभागातून मोठी मदत होत आहे. आतापर्यंत तालुक्यातील १९ जिल्हा परिषद शाळांमध्ये कक्ष स्थापन झाले आहेत. अलोरे, असुर्डे, सती- चिंचघरी, धामणवणे, कळंबट, कळंबस्ते, कापसाळ, कामथे बुद्रुक, जावळेवाडी व माटेवाडी, कुंभार्ली, कुटरे, कोकरे, कोंडमळा, कोळकेवाडी, पायरवाडी, खडपोली, वाकणवाडी, खेर्डी, वहाळ, वालोपे, मांडकी बुद्रुक, मुतर्वडे, टेरव, पिंपळी बुद्रुक, वेहेळे, मांडकी हायस्कूल, मिरजोळी, निवळी, पेढे, पोफळी, रामपूर, सावर्डे, शिरगाव, वीर आदी गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.
लोकसहभागाचा मोठा हातभार
जिल्हा परिषद शाळा व समाजमंदिरात कक्ष सुरू करताना तेथे कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. सर्व नव्याने विश्व निर्माण करावे लागत आहे. त्यासाठी लोकसहभागाचा मोठा हातभार लागत आहे. काही कक्षामध्ये दानशूरांनी रुग्णांसाठी गाद्या, टीव्ही, साउंड सिस्टिम, ताट, तांब्या, वाटी आदी जेवणासाठी लागणारे साहित्य, पंखे यासह विविध आवश्यक साहित्य दिले आहे.
...............
सद्य:स्थितीत कापसाळ शाळेत सात बेडचे विलगीकरण कक्ष सुरू केले असून, लवकरच अठरा बेड उपलब्ध केले जाणार आहेत. गावातीलच दोन डॉक्टर रुग्णांची दोन वेळा तपासणी करतात. त्याला रुग्णांकडून प्रतिसादही मिळू लागला आहे. त्याशिवाय आरोग्य यंत्रणा, आशासेविकादेखील चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत.
-सुनील गोरीवले, सरपंच, कापसाळ
..................
खेर्डी ग्रामपंचायतीतर्फे ६० बेडचे विलगीकरण कक्ष उभारले असून, गावातील १३ डॉक्टर्समार्फत रुग्णांची तपासणी केली जात आहे. सद्य:स्थितीत १२ रुग्ण उपचार घेत आहेत. ज्यांना आवश्यक आहे, त्यांना नाष्टा, जेवण दिले जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाविषयी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अन्य सोयी-सुविधांवरही भर दिले जात आहे.
-वृंदा दाते, सरपंच खेर्डी