इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे टीकास्त्र
By मनोज मुळ्ये | Published: May 3, 2024 06:29 PM2024-05-03T18:29:05+5:302024-05-03T18:31:35+5:30
ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घ्यायची लाज वाटते, त्यांची शिवसेना खरी कशी असेल?
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उभी राहिलेली इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केली. या फॅन क्लबसोबत राहायचे की नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहायचे, हे तुम्हाला निश्चित करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार उद्धव ठाकरे नसून, एकनाथ शिंदे, नारायण राणे, राज ठाकरे हे आहेत असेही ते म्हणाले.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप नेते अमित शाह यांची जाहीर प्रचारसभा रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर झाली. यावेळी व्यासपीठावर नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम, किरण सामंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, डॉ. पां. वा. कामणे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची ही भूमी असल्याने येथे येण्याचा आपल्याला अतिशय आनंद असल्याचे मंत्री अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी प्राधान्याने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य बनवले. ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घ्यायची लाज वाटते, त्यांची शिवसेना खरी कशी असेल? उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे आणि एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे, असे ते म्हणाले. जे स्वत:ची सत्ता आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या आश्रयाला गेले, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ३७० कलम हटवले गेले. जगात अकराव्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली. आता तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले तर हीच अर्थव्यवस्था अमेरिका, रशियापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर येईल. देशातून मुस्लिम पर्सनल लॉ संपवण्यात येईल, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी गेल्या काही वर्षात मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची व त्याच्या लाभार्थ्यांची माहिती दिली. कोरोना काळात मोदी सरकारने लोकांना लस दिली आणि त्यावेळी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात खिचडी खात होते, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, कोकरे महाराज, माजी आमदार बाळ माने, चित्रा वाघ, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत अणि नारायण राणे यांची भाषणे झाली.
दगड उचलायचीही हिंमत नाही
कलम ३७० हटवले गेले तर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, असे राहुल गांधी यांचे मत होते. मात्र पाच वर्षात काश्मीरमध्ये दगड उचलण्याची हिंमतही कोणी केलेली नाही, असे शाह यांनी सांगितले.