भारतीय लष्कराच्या साहसी समुद्र सफरीची रत्नागिरीतून आगेकूच सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:40 PM2017-12-14T17:40:52+5:302017-12-14T17:48:23+5:30

भारतीय लष्कराच्या ६४ जवानांची १ डिसेंबर रोजी मुंबई येथून सुरू झालेली एका महिना अवधीची साहसी समुद्र सफर रत्नागिरीतून बुधवारी मुंबईकडे रवाना झाली. सैनिकांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे व त्यांच्या अनुभवामुळे ते वादळामुळे दोन मीटर फुगवटा आलेल्या व जहाजांना अस्थिर करणाऱ्या समुद्रातून मार्गक्रमण करीत पहिले व दुसरे चरण यशस्वीरित्या पार करू शकले.

The Indian Army's adventure started from the coast of Ratnagiri | भारतीय लष्कराच्या साहसी समुद्र सफरीची रत्नागिरीतून आगेकूच सुरु

भारतीय लष्कराच्या ६४ जवानांची १ डिसेंबर रोजी मुंबई येथून सुरू झालेली एका महिना अवधीची साहसी समुद्र सफर रत्नागिरीतून बुधवारी मुंबईकडे रवाना झाली.

googlenewsNext
ठळक मुद्दे४ सी बर्ड प्रजातीच्या जहाजांमधून समुद्र सफर सुरू सफरीमध्ये प्रत्येक जहाजावर ५ अधिकारी अंतिम म्हणजेच चतुर्थ चरणाचा मुंबईकडे प्रवास सुरू

रत्नागिरी : भारतीय लष्कराच्या ६४ जवानांची १ डिसेंबर रोजी मुंबई येथून सुरू झालेली एका महिना अवधीची साहसी समुद्र सफर रत्नागिरीतून बुधवारी मुंबईकडे रवाना झाली.

४ सी बर्ड प्रजातीच्या जहाजांमधून सुरू असलेल्या समुद्र सफरीमध्ये प्रत्येक जहाजावर ५ अधिकारी आहेत. या मोहिमेच्या १२व्या दिवशी म्हणजेच दिनांक १२ डिसेंबर रोजी रत्नागिरी किनाऱ्यावर येताच या जहाजांनी चार चरणांत पार पाडावयाच्या या सफरीचे तृतीय चरण यशस्वीरित्या पार पाडले आणि दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता भगवती जेटीवरून मुंबईकडे रवाना झालेल्या जहाजांचा अंतिम म्हणजेच चतुर्थ चरणाचा प्रवास सुरू झाला.

यातील प्रथम चरण मुंबई ते रत्नागिरी तर द्वितीय चरण रत्नागिरी ते गोवा या प्रवासाचे होते. याआधी ही जहाजे प्रथम चरणांती दिनांक ३ डिसेंबर रोजी रत्नागिरी किनाऱ्यावर आली होती.

प्रत्येक चरणानंतर नवीन सैनिकांना पाचारण करून सर्वांना संधी दिली जात आहे. यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा तसेच राष्ट्रीय नौकायान अजिंक्यपद विजेते सैनिकांचादेखील समावेश आहे. या सफारीनंतर त्यांना समुद्रातील सर्वात कठीण परिस्थितीचा सामना करण्याचा अनुभव मिळत आहे.

परतीचा प्रवास हा शांत समुद्रामुळे नौकायनासाठी अनुकूल ठरत आहे. चतुर्थ चरण मुंबई येथे पूर्ण होणार आहे. भारतीय लष्करातर्फे अनेकवेळा अशा समुद्र्र सफरींचे आयोजन केले जाते. पण, ही पहिलीच वेळ आहे की, ज्यात इतक्या मोठ्या संख्येने सैनिकांना सहभागी करून घेण्यात आले. या सफरीचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल भुवन खरे यांच्याकडे आहे.

रत्नागिरी येथे भारतीय तटरक्षक दलातर्फे त्यांच्या आय सी-३०२ या नौकेने समुद्र्र सफरीवरील या जहाजांचे मार्गदर्शन केले. या सफरीसाठी त्यांना रसद व आवश्यक ती मदत पुरवण्यात आली. नौदलाचे आयएनएस तराशा हे जहाज या सफरीबरोबर सदैव तैनात ठेवले आहे. अशी साहसी कृत्ये ही भारतीय सेना दलांची ओळख असून, यामुळे सैनिकांमध्ये ऐक्य, संघभाव, समन्वय, जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती इत्यादी गुणांची जोपासना होते.

ओखी वादळाचे आव्हान

प्रवासातील प्रथम दिवस शांत समुद्रामुळे सफरीसाठी अनुकूल ठरला, तर दुसऱ्या दिवसापासून नौकायन ओखी या सागरी वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे आव्हानात्मक ठरले होते. सैनिकांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे व त्यांच्या अनुभवामुळे ते वादळामुळे दोन मीटर फुगवटा आलेल्या व जहाजांना अस्थिर करणाऱ्या समुद्रातून मार्गक्रमण करीत पहिले व दुसरे चरण यशस्वीरित्या पार करू शकले.

मुंबई ते रत्नागिरी खडतर प्रवास

ओखी वादळामुळे समुद्र सफरीत अनेक अडचणी आल्या. मात्र, तरीही सैनिकांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. परतीच्या प्रवासाच्या वेळी समुद्र शांत असल्याने हा प्रवास सुखकर होणार आहे. मात्र, मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास खूपच खडतर होता.

समुद्रातील वादळामुळे जीव मुठीत धरूनच सागरी प्रवास करावा लागला. मात्र, आम्ही डगमगलो नाही. उलट हे सर्व जास्त  चॅलेंजिंग होते अन् आम्ही आव्हाने स्वीकारणारी माणसे आहोत. त्यामुळे हा आव्हानात्मक वाटणारा प्रवास आम्ही पार केला, अशा शब्दात या जहाजावरील लष्करी जवानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रवासाबाबत त्यांनी अनेक आठवणी यावेळी सांगितल्या.
 

Web Title: The Indian Army's adventure started from the coast of Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.