कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटना घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:13+5:302021-06-18T04:22:13+5:30
रत्नागिरी : कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही असे विद्यार्थी असल्यास ...
रत्नागिरी : कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही असे विद्यार्थी असल्यास येथील जैन संघटना अशा अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढे आली आहे.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. बीजेएसच्या वाघोली (पुणे) येथील शैक्षणिक संकुलातील मराठी माध्यमाच्या शाळेत या विद्यार्थ्यांना ५ वी ते १२ वीपर्यंत प्रवेश देण्यात येणार असून याच संकुलात वसतिगृह, नाश्ता, भोजन, खेळाचे मैदान, दवाखाना, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
याच शैक्षणिक संकुलात लातूर येथील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी अशा एकूण ३ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन गेल्या ३० वर्षांत भारतीय जैन संघटनेने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अशी अनाथ बालके असल्यास त्यांच्या शिक्षणासाठी येथील भारतीय जैन संघटनेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची माहिती असल्यास भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तमकुमार जैन यांच्या ९४२२३४४८५१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा. किंवा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महेंद्र गुंदेचा, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दयानंद मांगले, रायगड जिल्हाध्यक्ष अनिल चोपडा तसेच स्थानिक भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडे संपर्क करावा. मात्र, अशा मुलांची जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिकृत नोंद असल्यासच हा एकमेव निकष गृहीत धरून ही मदत दिली जाणार असल्याचे भारतीय जैन संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.