रत्नागिरीतील निर्बंध शिथील होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:07+5:302021-06-22T04:22:07+5:30
रत्नागिरी : ऑक्सिजन बेडची उपलब्धता आणि पाॅझिटिव्हिटी रेट कमी आल्याने आता रत्नागिरीत तिसऱ्या स्तरातील निर्बंध गुरूवारपासून शिथील करण्यास हरकत ...
रत्नागिरी : ऑक्सिजन बेडची उपलब्धता आणि पाॅझिटिव्हिटी रेट कमी आल्याने आता रत्नागिरीत तिसऱ्या स्तरातील निर्बंध गुरूवारपासून शिथील करण्यास हरकत नाही, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता तिसऱ्या स्तरातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही पाॅझिटिव्हिटी रेट कमी आला असून, सुमारे ५३ टक्के ऑक्सिजन बेड सध्या रिक्त आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची क्षमता पाहता रत्नागिरी जिल्ह्यात आता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध शिथील करायला हरकत नसल्याच्या निर्णयाप्रत जिल्हा प्रशासन आले आहे. त्यामुळे रत्नागिरीही आता तिसऱ्या स्तरात आणायला हवी, याबाबत बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी त्यांचा निर्णय घेतील. मात्र, शिथिलता दिली आणि नियमांचे उल्लंघन झाले तर तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, हा धोकाही सर्वांनीच लक्षात घ्यावा, असेही मंत्री सामंत म्हणाले.
३ कोविड सेंटरचे उद्घाटन
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुलांच्या मनोरंजनापासून ते अगदी अभ्यासासाठी सुविधा असलेले कोविड सेंटर जिल्हा क्रीडा कार्यालय येथे उभारण्यात आले आहे. तसेच स्वस्तिक हाॅस्पिटल येथेही ५० बेडचे बाल कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. महिला रूग्णालयात २० खाटांचा अतिदक्षता कक्ष मुलांसाठी उभारण्यात आला आहे. या सेंटर्स आणि ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा सोमवारी झाला असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
डाॅ. चव्हाण यांना धन्यवाद...
डाॅ. नितीन चव्हाण यांनी आपले रूग्णालय डागडुजी करून जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्याबद्द्ल मंत्री सामंत यांनी डाॅ. चव्हाण यांना धन्यवाद दिले. १० वर्षांपुढील बालके बाधित झाल्यास त्यांना या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर त्याआतील बालकांना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या कोविड रूग्णालयात तसेच महिला रूग्णालयातील स्वतंत्र विशेष कक्षात ठेवण्यात येणार आहे.
तिसरी लाट न येण्याची प्रार्थना...
तिसऱ्या लाटेत बालके बाधित होऊ नयेत, यासाठी सुसज्ज अशी कोविड सेंटर्स उभारण्यात आली आहेत. बालके सुरक्षित राहोत, ही प्रार्थना आपली ईश्वरचरणी असेल. असं झालं तर कोविड केअर सेंटरसाठी केलेला खर्च वाया गेला तर त्याचेही काही वाटणार नाही, अशा शब्दात सामंत यांनी भावना व्यक्त केल्या.