इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आर्थिक कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:35 AM2021-08-28T04:35:24+5:302021-08-28T04:35:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोकणातील पहिले बंदिस्त नाट्यगृह व चिपळूणचे वैभव असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे महापुरात किती ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोकणातील पहिले बंदिस्त नाट्यगृह व चिपळूणचे वैभव असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे महापुरात किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट नसले, तरी नूतनीकरणानंतरही पुन्हा एकदा हे केंद्र आर्थिक कचाट्यात सापडले आहे. याशिवाय तब्बल ३२ मालमत्तांचे पुरात नुकसान झाले असल्याने आर्थिकदृष्ट्या नगर परिषद आणखी अडचणीत आली आहे.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नूतनीकरणाचे काम गेली ४ वर्षे सुरू होते. अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त वातानुकूलित असे केंद्र असावे म्हणून नगर परिषदेने निधीची कमतरता न ठेवता मंजुरी दिली. काही वेळेला तर वाढीव कामांनादेखील थेट सभागृहात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. साहजिकच अंदाजपत्रकापेक्षा जास्त खर्च होत गेला. नंतर भ्रष्टाचार, घोटाळे असे आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे कामाची गती रोडावली. परंतु, नूतनीकरण अंतिम टप्प्यात आले होते. उर्वरित कामे आणि तांत्रिक अडचणी सोडवून किमान महिनाभरात केंद्राचे लोकार्पण होण्यास कोणतीच हरकत नव्हती. परंतु, कोरोना लॉकडाऊन आणि राजकीय आखाड्यात केंद्र तसेच पडून राहिले आणि २२ जुलैच्या महापुराने सांस्कृतिक केंद्राला जबरदस्त तडाखा दिला. अद्यापपर्यंत ७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यापैकी सुमारे ३ कोटी रुपये संबंधित ठेकेदाराला देयक देणे शिल्लक आहे. उर्वरित कामासाठी २ कोटी रुपये अपेक्षित असून, त्यांची निविदाप्रक्रिया राबवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत महापुरामुळे झालेले नुकसान अडचणींचा मुद्दा बनला आहे.
केंद्रातील खुर्च्या, व्यासपीठ, इंटिरियर, साउंडसिस्टीम, वातानुकूलित यंत्रणा असे प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसान किती झाले याच्याशी संबंधित ठेकेदाराचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचे पूर्ण देयक हे त्याला अदा करावेच लागणार आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा बोजा थेट नगर परिषदेच्या तिजोरीवर पडणार आहे. तसेच आता पुन्हा केंद्र तात्पुरते सुरू करण्यासाठी किमान ३ कोटी रुपयांची आवश्यकता भासेल असा अंदाज आहे. तर उर्वरित कामासाठी २ कोटी म्हणजेच पुन्हा ५ कोटी रुपये खर्च करणे आवश्यक असल्यास इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा पूर्ण खर्च किमान १२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामाचे ठेकेदाराचे शिल्लक देयक, दुरुस्तीसाठी लागणारा निधी आणि उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया अशा अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार असल्याने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र पुन्हा लवकर सुरू होण्याच्या आशा मावळल्या आहेत.
---------------------
महापुरात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासह नगर परिषदेच्या अन्य ३२ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. यामध्ये नगर परिषद इमारत, साने गुरुजी उद्यान, पवन तलाव स्टेडियम, एल टाइप शॉपिंग सेंटर, पंपहाउस अन्य मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी नगर परिषदेला शासनाकडून वेगळ्या पॅकेजची अपेक्षा केली जात आहे.