इंदुराणी जाखड यांची साखरपा कोविड सेंटरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:51+5:302021-06-24T04:21:51+5:30
साखरपा : कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी साखरपा कोविड सेंटर व ...
साखरपा : कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी साखरपा कोविड सेंटर व साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी कोविड सेंटरमधील रुग्णांची आस्थेने विचारपूस करून धीर दिला आणि आरोग्य केंद्रातील स्वच्छतेविषयी समाधान व्यक्त केले.
पंचायत समिती सभापती जया माने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जाखड यांनी कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीलाही धावती भेट दिली. तेथे सरपंच बापू शेट्ये यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सभापती जया माने, कोंडगाव सरपंच बापू शेट्ये, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर यांनी कोंडगाव बाजारपेठ सुरु करण्याची आग्रही मागणी केली. कोंडगावमधील सर्व व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करत आतापर्यंत प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र, सततच्या लॉकडाऊनला व्यापारी व जनता कंटाळली असून, कोंडगावमधील लॉकडाऊन शिथील करावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली.
यावेळी सभापती जया माने, कोंडगाव सरपंच बापू शेट्ये, साखरपा सरपंच विनायक गोवरे, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवणकर, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय गांधी, पंचायत समिती कर्मचारी घुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. पोपट आदाते, आरोग्य कर्मचारी दत्तात्रय भस्मे, पोलीसपाटील मारुती शिंदे, मंडल अधिकारी दामले, तलाठी आत्माराम मुरकुटे, ग्रामसेवक राजेश इंदुलकर, संतोष पोटफोडे, भरत माने, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
..........................
लसीकरणाबाबत विशेष प्राधान्य द्या
येत्या आठवड्यात लॉकडाऊन संदर्भात चांगला निर्णय मिळण्याची शक्यता इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केली. कोंडगावमधील सर्व पात्र व्यक्तींचे तातडीने लसीकरण करुन घेण्याची सूचनाही त्यांनी केली.