औद्योगिक सुरक्षेचे यंत्र बिघडलेलेच!
By admin | Published: November 2, 2014 12:49 AM2014-11-02T00:49:00+5:302014-11-02T00:49:00+5:30
वाऱ्यावरची वरात : कंपन्या एकीकडे, सुरक्षेचे कार्यालय दुसरीकडेच...
श्रीकांत चाळके, खेड : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षाव्यवस्था सध्या धोक्यात आली आहे. कंपन्यांमध्ये विविध कारणाने अपघात होत आहेत. कारखान्यांच्या सुरक्षिततेच्या दुुष्टीने या वसाहतीमध्ये कोणतीही सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली नाही. यामुळे या अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे बोलले जात आहे़ मात्र यामध्ये कामगारांचा हकनाक बळी जात असून औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी येथे येऊन नेमके काय करतात? याविषयीच आता शंका उपस्थित होऊ लागले आहे.
सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली यंत्रणा आणि तिचे कार्यालय कोल्हापूर येथे असल्याने येथील कंपन्या बेफिकिरपणे काम करीत आहेत. शिवाय येथील उद्योजकांचे पैशासाठी वाट्टेल ते करायची तयारी आहे़ राजकीय पुढारी आपले मोठमोठे ठेके हातून जातील, या भीतीने कंपन्यांविरोधात ब्र काढायला तयार नाहीत़ यामुळे अपघात होऊनही कंपन्यांना जाब विचारण्यास धजावत नाहीत. यामुळे या वसाहतीतील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ अनेक कामगारांचे हकनाक बळी गेले आहेत़ औद्यौगिक सुरक्षेसाठी असलेले कार्यालय येथे नसल्याने आणि कंपन्यांना विचारणारे कोणी नसल्याने लोटे औद्यौगिक वसाहतीच्या कारखान्यांतील कामगारांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे.
वर्षभरात याच औद्यौगिक वसाहतीतील रत्नागिरी केमिकल्स प्रा. लि. आणि सुप्रिया लाईफसायन्सेस लि़ या कारखान्यात वायूगळती झाली होती़ यातील रत्नागिरी केमिकल्स कंपनीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला तर सुप्रिया लाईफसायन्सेसमध्ये १२ कामगारांना वायुबाधा झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते़
यानंतर आठवडाभरातच याच कंपनीत एका कामगाराच्या अंगावर लोखंडी टाकीचा स्टॅण्ड पडला होता़ यामुळे त्याच्या चेहऱ्यावर रसायन उडाल्याने तो भाजल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी दोन्ही कंपन्यांच्या मालक आणि व्यवस्थापन आणि आॅपरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ या घटनेच्या काही महिने अगोदर डॉ़ खान कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात ३ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता.
वर्षभरात अशा अनेक आगीच्या आणि स्फोटाच्या घटना घडत असताना जखमी व मृत कामगारांची यादी मात्र वाढतच चालली आहे. याला मानवी चुका आणि तांत्रिक दोषदेखील जबाबदार आहेत़ तरीदेखील औद्यौगिक सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते कोल्हापूर येथील पथक अद्याप सुस्तच आहे. कारखान्यांच्या तपासणीसाठी वारंवार येत असलेले हे अधिकारी नेमके काय करतात? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मोठमोठे अपघात घडूनही हे अधिकारी कंपनीला जबाबदार धरीत नाहीत, तसेच अधिकाऱ्यांना दोषही देत नाहीत़ अनेक कारखान्यांमध्ये आजही सुरक्षेविषयक आवश्यक साधनसामुग्रीचा अभाव आहे.
कंपन्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न आजही गंभीर बनला आहे. या दूषित पाण्यामुळे खाडीतील पाणी प्रदूषित होत असून मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यामुळे येथील कंपन्यांचे भवितव्यदेखील टांगणीला लागले आहे. कमी पगारात येथील अशिक्षित स्थानिक तसेच परप्रांतीय कामगारांना राबवून घेतले जात असून त्यांनाच हे अधिकारी व कंपन्या जबाबदार धरीत आहेत़ लागोपाठ घडत असलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोणालाही कसलेही गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे़ पंजाब केमिकल कंपनीतील गेल्या दोन वर्षातील स्फोटांची गंभीर समस्या कंपनीसमोर आहेच़ घर्डा कंपनीमध्ये तर अधूनमधून लहानमोठे अपघात घडत असतात़ मात्र या कंपनीने विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारल्या आहेत. यामुळे येथील कामगार काहीअंशी सुरक्षित असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे़ औद्यैगिक सुरक्षा व्यवस्थेचे कार्यालय येथे नसल्याने या वसाहतीतील अनेक कंपन्यांवर आजही धोक्याची टांगती तलवार आहे.