अर्थचक्रासाठी औद्योगिकरण हवे अन् लोकांची सुरक्षितताही हवीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:39+5:302021-04-13T04:30:39+5:30
सुनील आंब्रे लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : औद्योगिकरणामुळे येणारी असुरक्षितता नकोशी झाली असली तरी हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत बदल ...
सुनील आंब्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : औद्योगिकरणामुळे येणारी असुरक्षितता नकोशी झाली असली तरी हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत बदल घडवणारे, स्थानिक अर्थकारणाला गती देणारे कारखानेही हवेच आहेत. अशावेळी गरज आहे ती सक्षम यंत्रणा उभारण्याची आणि यंत्रणांनी सक्षम राहण्याची. सुरक्षेचे निकष कंपन्यांकडून पाळले जात आहेत की नाहीत, याची कडक तपासणी व्हावी आणि जिथे चूक असले तिथे कडक कारवाईही व्हावी, तरच सुरक्षितता आणि अर्थकारण यात सुवर्णमध्य साधला जाईल.
लोटे येथे महामार्गालगतच उजाड माळरानावर एक एक कारखाना उभा राहिला आणि आता खूप मोठी औद्योगिक वसाहत निर्माण झाली आहे. १९८५/८६ साली या वसाहतीमध्ये कारखाने दाखल होण्यास सुरुवात झाली. त्याआधी या परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. कारखान्यांनी अर्थकारणाला गती दिली. लोकांच्या हाताला काम दिले. साहजिकच परिसरात सुबत्ता आली. छोटे-मोठे व्यवसाय उभे राहिले. शिक्षण, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात औद्योगिकरणामुळेच मोठा बदल झाला आहे. उच्च माध्यमिक विद्यालयापासून अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या या वसाहतीचा लाभ केवळ रत्नागिरीच नाही तर लगतच्या जिल्ह्यांमध्येही होत आहे.
एका बाजूला या कंपन्यांमुळे निर्माण झालेला असुरक्षितपणा आहे, या कंपन्यांमधील स्फोटांमुळे, अपघातांमुळे होणारे नुकसान आहे, तर दुसऱ्या बाजूला या कंपन्यांमुळे अर्थकारण, सामाजिक, शैक्षणिक सकारात्मक बदल आहेत. असुरक्षितपणा आहे म्हणून कंपन्या नाकारणे तोट्याचे आहे आणि फायदा होत आहे म्हणून आहे ती परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारणेही तोट्याचे आहे. त्यामुळे यातून सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे. कंपन्या टिकायला हव्यात आणि या परिसरातील लोकांचे आरोग्यही टिकायला हवे. त्यासाठी कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. लोटे भागात रासायनिक कारखाने असल्याने या यंत्रणा लोटेमध्येच कार्यरत असणेही गरजेचे आहे. या यंत्रणांनी नि:पक्षपाती काम करावे, यासाठी त्यांच्यावर राजकीय दबावही तेवढाच गरजेचा आहे.
उद्योग टिकले तर रोजगार कायम राहील आणि माणसे टिकली तर उद्योगांना कामगार, कर्मचारी मिळत राहतील. या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. जर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा सक्षम असतील तर अपघातांचे प्रसंग कमीत कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो आणि त्याने असुरक्षितपणाचे ओझे काहीसे कमी होऊ शकते.
(समाप्त)
..................................
आरोग्य सुविधाही मिळाल्या
येथील काही कंपन्यांनी गावागावात आरोग्य केंद्रे उभारली आहेत. तेथे स्थानिकांना मोफत औषधोपचार केला जातो. जीवघेण्या आजारावर मोठ्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यासाठी स्थानिकांना कंपन्यांकडून अर्थसाह्यही केले जाते. काही कंपन्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला असून, महिला स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी विविध प्रशिक्षणे, शिबिरे घेतली जात आहेत. ही बाब सीएसआर फंडातून करणे अनिवार्य असले तरी त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम या परिसरावर झाला आहे.