काँग्रेसच्या कुबड्या घेतलेल्यांनी लाथ घालायची भाषा करु नये; मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By मनोज मुळ्ये | Published: February 6, 2024 03:21 PM2024-02-06T15:21:55+5:302024-02-06T15:23:52+5:30

'ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी'

Industries Minister Uday Samant criticizes Thackeray Shiv Sena chief Uddhav Thackeray | काँग्रेसच्या कुबड्या घेतलेल्यांनी लाथ घालायची भाषा करु नये; मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

काँग्रेसच्या कुबड्या घेतलेल्यांनी लाथ घालायची भाषा करु नये; मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

रत्नागिरी : जे काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचत आहेत, त्यांनी कोणालाही लाथ घालायची भाषा करु नये, असा पलटवार उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. आपण रत्नागिरीत ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रम केले. या दोन कार्यक्रमांच्या मध्ये एक मनोरंजनाचा कार्यक्रम करण्यात आला, अशी टीकाही त्यांनी ठाकरे यांच्या मेळाव्यावर केली.

मंगळवारी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याबाबत टीका केली. रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा ऐतिहासिक आणि विठ्ठल मूर्तीच्या लोकार्पणाचा धार्मिक कार्यक्रम आपण केला. या कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपण आभारी आहोत, असे ते म्हणाले. या दोन कार्यक्रमांच्या मधे एक करमणुकीचाही कार्यक्रम होता, असे त्यांनी ठाकरे यांच्या सभेबद्दल सांगितले. आधी जे शिवाजी पार्कवर सभा घेत होते, त्यांच्यावर आता रस्त्यावर, बोळात, चावडीवर सभा घेण्याची वेळ आली आहे. ही सभा म्हणजे टोमणे आणि कुटुंबाच्या बदनामीचा कार्यक्रम होता, असे ते म्हणाले.

आपण गद्दाराच्या पेकाटात लाभ घालायला आलो आहोत, असे पक्षप्रमुखांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचणाऱ्यांनी लाथ घालायची भाषा करु नये, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

खरंच गद्दारांना गाडायचे आहे

गद्दारांना गाडायचे आहे, या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याची आपण पूर्ण सहमत आहोत. बाळासाहेब सांगायचे की मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर आपण पक्ष बंद करू. पण आता ठाकरे शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी आहे, अशी टीका मंत्री सामंत यांनी केली.

व्यवसाय नसताना इमारत

आपल्या वडिलोपार्जित बांधकामाच्या व्यवसायावरुन ठाकरे यांनी टीका केली. पण एक गोष्ट चांगली आहे की आमचा व्यवसाय आहे, हे त्यांनी मान्य केले. अर्थात त्यांनी आपल्या व्यवसायावर टीका केली असली तरी कोणताही व्यवसाय नसताना त्यांनी सहा मजली घर कसे बांधले, हा प्रश्न आपण आजपर्तंत कधीही विचारला नाही आणि यापुढेही विचारणार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Industries Minister Uday Samant criticizes Thackeray Shiv Sena chief Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.