लोटे येथील वीज उपकेंद्र जळाल्याने उद्योग ठप्प
By admin | Published: March 11, 2015 11:52 PM2015-03-11T23:52:23+5:302015-03-12T00:06:13+5:30
लाखोंची हानी : ४० गावांतील पुरवठा खंडित; साडेसात हजार ग्राहक अंधारात
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीसह परिसरातील ४० गावांना वीजपुरवठा करणारे उपकेंद्र मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे जळाले. त्यामुळे वसाहतीसह जवळपास साडेसात हजार वीज ग्राहक अंधारात बुडाले आणि ४० हून अधिक कारखाने ठप्प झाले. त्यामुळे कारखान्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ आठ ते दहा मोठ्या कंपन्याच स्वत:ची पर्यायी सुविधा वापरून सुरू होत्या.वीज उपकेंद्रातून अनेक दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होणे, नैसर्गिक आपत्तीवेळी दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवणे, अनेकदा ट्रान्स्फॉर्मर जळणे, वीजवाहिन्या तुटणे, सोमवारी पूर्ण दिवस वीजपुरवठा बंद ठेवणे अशा अनेक तक्रारींनी नागरिकांसह लघु उद्योजक त्रस्त आहेत. त्यातच मंगळवारी रात्री लोटे येथील वीज उपकेंद्र जळाले. त्यामुळे या समस्यांमध्ये आणखीनच भर पडली आहे.काळोखात बुडालेल्या ४० गावांपैकी काही गावांना वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होता. उर्वरित ग्राहकांची समस्या उद्या, गुरुवारी सायंकाळपर्यंत मिटण्याची शक्यता महावितरणने व्यक्त केली आहे. पॅनल व उच्च दाबाच्या तारा जळाल्या आहेत. त्या उपलब्ध नसल्याने रत्नागिरी वा अन्य ठिकाणाहून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री वीज खंडित झाल्यापासून औद्योगिक कंपन्यांचे बरेच हाल झाले. लघु आणि मध्यम कारखाने सकाळच्या शिफ्टपासून सुरू होतात. मात्र, वीज नसल्यामुळे ४० हून अधिक कारखाने बंद राहिले. कर्मचारी कामावर हजर झाले. मात्र, वीज नसल्यामुळे त्यांना बसूनच राहावे लागले. वीजपुरवठा लवकर सुरू व्हावा, यासाठी अनेक कंपन्यांचे अधिकारी महावितरण कंपनीच्या मदतीला धावले.एक पूर्ण दिवस कामकाज बंदच राहिल्यामुळे कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तीनही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आठ ते दहा मोठ्या कंपन्यांची स्वत:ची पर्यायी व्यवस्था असल्यामुळे त्यांचे कामकाज ठप्प झाले नाही. मात्र, त्यांनाही या प्रकाराची झळ बसली आहे. (वार्ताहर)
उंदराने केला प्रताप
मध्यरात्री एक वाजता येथील कंट्रोल पॅनलमध्ये उंदीर शिरल्याने शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण पॅनल जळाले. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
मोबाईल चार्जिंगसाठी धावाधाव
वीज खंडित झाल्यामुळे मोबाईलधारकांची पंचाईत झाली. अनेकांनी आपले ‘डिस्चार्ज’ झालेले मोबाईल घेऊन बँका-पतसंस्थांमध्ये धाव घेतली. बँका-पतसंस्थांमध्ये इन्व्हर्टर सुविधा असल्यामुळे तेथे आपल्या ओळखीच्या लोकांना मोबाईल चार्ज करण्यासाठी विनंती केली जात होती.
काही कंपन्यांनी तशा प्रकारची सामग्री व मनुष्यबळ देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास औद्योगिक संघटनेने प्राधान्य दिले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने वसाहतीसह परिसरातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली असून, बुधवारी सायंकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. - प्रशांत पटवर्धन, औद्योगिक संघटना अध्यक्ष