हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात घसरण
By admin | Published: March 18, 2016 10:40 PM2016-03-18T22:40:15+5:302016-03-18T23:32:04+5:30
वाशी मार्केट : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतून १६ हजार आंबा पेट्या दाखल
रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी मार्केटमध्ये १६ हजार आंबा पेट्या विक्रीस उपलब्ध होत्या. आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. १००० ते १५०० रूपये डझन असलेला आंबा आता ३०० ते ८०० रूपये डझनवर येऊन ठेपला आहे. यामुळे आंब्यासाठी केलेला खर्च भरून कसा येईल याच विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहे.
गत आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर तसेच फळांवर काळे डाग पडले आहेत. मोहोरावरील बुरशीसदृश्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी अद्याप शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक खर्चात दिवसेंदिवस वाढच होत आहे. वाढता इंधनखर्च, मजुरी, कीटकनाशकांचा खर्च, खोका, हमाली, दलाली तसेच भाडेतत्वावर घेतलेल्या बागांसाठी मोजावे लागणारे पैसे, संबंधित सर्व खर्च जावून शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे येणार हाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. फयानपासून दरवर्षी येनकेन प्रकारे आंबा पिकाचे उत्पादनात नैसर्गिक परिस्थितीमुळे घट होत आहे.
उष्म्यामुळे फळ तयार होण्याच्या प्रक्रियेबरोबर भाजण्याचा धोका देखील वाढला आहे. फळांवर काळे डाग पडत असून, आंबा गळून जमिनीवर पडत आहे. काळे डाग असलेला आंबा मार्केटमध्ये चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरवर्षी शासनाकडे शेतकरी समस्या मांडत असतात. परंतु शासनाकडून तुटपंूजी आर्थिक मदत देऊ केली जाते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आखडता हात घेतला जातो. शासनाला शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल, तर दरावरती निर्बंध आणावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल.
सध्या वाशी मार्केटमधून आखाती प्रदेशात निर्यात सुरू करण्यात आली आहे. परदेशातील व्यापाऱ्यांकडून आंब्याला मागणी होत असली, तरी पुरवठा करण्यात शेतकरी कमी पडत आहेत. वास्तविक पुर्नमोहोर प्रक्रियेमुळे सुरूवातीचा आंबा गळून गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे आंबा कमी आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतून १६ हजार पेट्या दिवसाला विक्रीसाठी येत आहेत. (प्रतिनिधी)
ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहोर काळा पडला आहे. खारसदृश्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संबंधित बुरशी रोखण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत आहे. अद्याप शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्च वाढला आहे. मोहोरावरील बुरशी फळांवर येत असल्यामुळे काहीवेळा फळेदेखील पुसावी लागत आहेत.
एस. पी. सावंत, शेतकरी.