रत्नागिरी : चिपळुणात दशावतार नाट्य महोत्सवाला प्रारंभ, पहिल्या दिवशी दुर्वास भोजनला उत्साही प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:24 PM2018-01-18T15:24:55+5:302018-01-18T15:33:24+5:30
चिपळूण येथील पवन तलाव मैदानावर सुरु असलेल्या दशावतार नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी ओंकार दशावतारी नाट्यमंडळ, कसाल (ता. कुडाळ) यांचा दुर्वास भोजन हा रामायणावर आधारित नाट्यप्रयोग कलाप्रेमींची दाद मिळवून गेला. या महोत्सवाला पहिल्या दिवशी चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने उर्वरित कालावधीतही येथील कलाप्रेमींचा या महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभणार आहे.
चिपळूण : येथील पवन तलाव मैदानावर सुरु असलेल्या दशावतार नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी ओंकार दशावतारी नाट्यमंडळ, कसाल (ता. कुडाळ) यांचा दुर्वास भोजन हा रामायणावर आधारित नाट्यप्रयोग कलाप्रेमींची दाद मिळवून गेला. या महोत्सवाला पहिल्या दिवशी चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने उर्वरित कालावधीतही येथील कलाप्रेमींचा या महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री, कोकणचे सुुपुत्र विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम दिनांक २२ जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी ६.३० वाजता सुरु होणार आहे. आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
यावेळी ओंकार दशावतारचे संचालक विजय वाडकर, लोककला अनुदानचे सदस्य तुषार नाईक, दशावतारचे ज्येष्ठ कलावंत डी. के. तांबे यांचा सत्कार करण्यात आला. दशावतार या कलेबाबत ज्यांनी संशोधन केले, त्या डॉ. तुलशी बेहरे यांनाही यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.
१९ रोजी आरोलकर पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ, आरवली यांचा वृंदा जलधर हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. २० रोजी बाबी नालंग दशावतारी नाट्यमंडळ, ओसर, (ता. कणकवली) यांचा ह्यभीमाशंकरह्ण हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार होणार आहे.
२१ रोजी गुरुकृपा दशावतारी लोककला नाट्यमंडळ, हळवल, (ता. कणकवली) यांचा हुंडलासूर हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. २२ रोजी ओम विरभद्र दशावतार नाट्यमंडळ, भांडूप (प.), मुंबई यांचा पावन झाली कोकणभूमी हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.