लोककलावंतांना मदत करण्याचा उपक्रम कौतुकास्पद : अनिल लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:57+5:302021-06-16T04:42:57+5:30
रत्नागिरी : लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोरोनाकाळात पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बाजवली आहे. पत्रकारिता करतानाच ...
रत्नागिरी : लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोरोनाकाळात पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बाजवली आहे. पत्रकारिता करतानाच सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी लोककलावंताना मदत करण्याचा केलेला प्रयत्न प्रोत्साहन देणार ठरेल, असे प्रतिपादन रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी केले.
सोमवारी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आधार प्रतिष्ठान आयोजित पत्रकार आणि मित्र व पल्लवी फाउंडेशनच्या विद्यमाने रत्नागिरीतील ३०० गरजू लोककलावंताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, संदीप तावडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव राजेश कळंबटे, पत्रकार विजय पाडावे, राकेश गुडेकर, तन्मय दाते, गुरुप्रसाद सावंत, गणेश भिंगार्डे, सूरज आयरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रतिष्ठानचे सचिव राजेश कळंबटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर लोककलावंतांना मदत करण्याच्या कार्यक्रमाचे स्वरूप उपस्थितांसमोर मांडले. नमन, जाखडी या कोकणच्या प्रमुख लोककला. या पाहण्यासाठी देशासह परदेशातील पर्यटक येथे येतात. गावेगावच्या लोककलावंतांनी ही कला जिवंत ठेवली आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येकजण अडचणीत आहे. आपले लोककलावंत शेतकरी, शेती करून कुटुंब चालवतात. त्यातूनच आपली लोककला जिवंत ठेवतात. त्यांना खारीचा वाटा म्हणून मदत करण्यासाठी मुंबईतील पत्रकार व मित्र, पल्लवी फाउंडेशन पुढे आले आहे. राज्यातील गरजू लोककलावंताना मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रत्नागिरीत आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची भेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असल्याचे कळंबटे यांनी सांगितले.
यावेळी जाखडी, नमन मंडळाच्या प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सोमेश्वर नाट्य नमन मंडळ वांद्री, संगमेश्वरी बाज आदी मंडळाच्या प्रतिनिधींना साहित्याचे वाटप करण्यात आले.