लसीकरण मोहिमेसाठी दि यश फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेजचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:27+5:302021-04-30T04:40:27+5:30
रत्नागिरी : दिनांक १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता दि यश फाऊंडेशनचे ...
रत्नागिरी : दिनांक १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता दि यश फाऊंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिकांसह ७ कर्मचारी प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुरविण्याचे काम करण्यास सज्ज झाले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव व्यवस्थापकीय विश्वस्त, माजी आमदार बाळ माने यांनी पाठवला आहे.
रत्नागिरीतील एकूण ३४ केंद्रांवर लसीकरण करण्याची यश फाऊंडेशनने तयारी केली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या १८ प्राथमिक शाळांमध्ये लसीकरण करता येईल. रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळांनुसार गाडीतळ, घाणेकर आळी, टिळक आळी, पऱ्याची आळी, तेली आळी, पाटीलवाडी, गोखले नाका, चवंडेवठार, घुडेवठार, खेडेकरवाडी, धनजी नाका, मांडवी, बंदर रोड, खालची आळी, मुरुगवाडा, किल्ला, हनुमानवाडी, मिरकरवाडा, पोलीस हेडक्वार्टर, जुना माळनाका, विश्वनगर, अभ्युदयनगर, हिंदू कॉलनी, निवखोल, राजीवडा, कर्ला रोड, आंबेशेत, मुरुगवाडा, पंधरामाड, चर्मालय, कोकणनगर, साळवी स्टॉप, क्रांतीनगर, कोकणनगर, पोलीस चौकी परिसर, हयातनगर, कीर्तीनगर येथे लसीकरण केले जाईल.
तसेच शहराजवळील जाकिमिऱ्या, शिरगाव, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल - उद्यमनगर, मिरजोळे पाटीलवाडी, हनुमाननगर, खेडशी नाका, सेंट थॉमस स्कूल, कारवांचीवाडी, कुवारबाव उत्कर्षनगर, महालक्ष्मीनगर, नाचणे सह्याद्रीनगर, नाचणे क्रमांक १, कर्ला, भाट्ये अशा १६ शाळांमध्येही लसीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.
रत्नागिरी शहर आणि आसपासच्या गावातील शाळांमधील या एकूण ३४ केंद्रांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील सुमारे एक लाख पात्र लोकसंख्या आहे. लसीकरणाचे हे शिवधनुष्य सरकारच्या मदतीने तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रतिदिन ७ हजार लस पुरवाव्यात, अशी विनंती या प्रस्तावात केली आहे. तसेच जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी कोविन अॅप, पोर्टलवर या ३४ केंद्रांची नोंदणी करून द्यावी, म्हणजे पात्र नागरिकांना तत्काळ नोंदणी करता येईल.
..........................................
सातजणांची टीम काम करणार
लसीकरण केंद्रावर डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका, कॉम्प्युटर ऑपरेटर, लसीकरण अधिकारी २ अशी ७ जणांची टीम काम करेल. लस ठेवण्यासाठी लागणारा डीपफ्रिजर, आयएलआर, व्हॅक्सिन कॅरिअर, बर्फ यांची आवश्यकता आहे. याकरिता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी परवानगी व प्रशिक्षण द्यावे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी खासगी केंद्र देण्याची तयारी दर्शवली आहे.