मत्स्य विद्यापीठाबाबत सर्वपक्षीयांकडून अन्याय; आजवर फक्त कागदपत्र रंगली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 04:55 AM2019-05-16T04:55:59+5:302019-05-16T05:00:02+5:30
कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या राजकीय पक्षांनी मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठाकडेही दुर्लक्ष केले आहे.
- मनोज मुळ्ये
रत्नागिरी : कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या राजकीय पक्षांनी मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठाकडेही दुर्लक्ष केले आहे. आतापर्यंत सरकारी पातळीवर दुर्लक्षामुळे कोकणातील मत्स्य महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना फटका बसण्याची वेळ आली आहे. सगळ्याच पक्षांनी कोकणावर अन्याय करण्याचे धोरण राबवल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत रत्नागिरीतील शिरगाव येथे १९८१ साली मत्स्य महाविद्यालय सुरू झाले. १९९८ साली महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पशू आणि मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम केला आणि २००० साली हे विद्यापीठ कार्यरत झाले. हे विद्यापीठ नागपूर येथे सुरू करण्यात आले. त्याला नागपूर, उदगीर आणि रत्नागिरी अशी तीन मत्स्य महाविद्यालये जोडण्यात आली. विदर्भ (नागपूर), मराठवाडा (उदगीर) आणि कोकण (रत्नागिरी) अशा तीन महसुली विभागांसाठी हे विद्यापीठ नागपूरमधून कार्यरत करण्यात आले. त्याच्या प्रशासकीय बाबींसह अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आला. समुद्र कोकणात आणि मत्स्य विद्यापीठ नागपुरात अशा अजब कारभारावर जोरदार टीका झाल्यानंतर १७ नोव्हेंबर २००० रोजी सरकारने एक अध्यादेश काढला आणि मत्स्य विद्यापीठाच्या यादीतून रत्नागिरीच्या शिरगाव येथील महाविद्यालय वगळले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे एक याचिका दाखल झाली होती. २००० साली स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ अस्तित्त्वात आल्यानंतरही शिरगाव मत्स्य महाविद्यालय त्याला जोडले नसल्याने महाविद्यालयाकडून २००० सालापासून देण्यात आलेल्या सर्व पदव्या रद्द करण्याची मागणी खंडपीठाकडे याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावर निकाल देताना खंडपीठाने शिरगाव महाविद्यालय नागपूर विद्यापीठाशी संलग्न करण्याबाबत दखल घेण्याचे आदेश दिले. त्यातूनच आजवर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांचा प्रश्न बिकट झाला आहे.
या सर्व प्रकरणाला आधी आघाडीचे आणि नंतर युतीचे सरकार जबाबदार आहे. अर्थात कोकणातील सर्वच पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील सदस्यांनीही या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
आतापर्यंत चारवेळा या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. २00४, २00८, २0१४ आणि २0१८ अशा चार वेळी अधिवेशनात मत्स्य महाविद्यालय आणि नागपूरचे विद्यापीठ असा विषय चर्चेला आला. किंबहुना त्यावर चर्चा आणि निर्णय व्हावा, यासाठी हा विषय तेथे मांडला गेला. मात्र त्यावर पुढे काहीही न झाल्यानेच या महाविद्यालयाबाबत सध्याची दोलायमान स्थिती निर्माण झाली आहे.
ज्या चारवेळा विषय मांडण्यात आला, त्यातील दोनवेळा आघाडीचे तर दोनवेळा युतीचे सरकार होते. मात्र, यातील कोणत्याही पक्षाच्या सरकारने कोकणाला कायमस्वरूपी दिलासा देणारा निर्णय घेतलेला नाही. हाच विषय नाही तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या विषयाकडेही असेच दुर्लक्ष करण्यात आले आहे.
समुद्र किनारा कोकणात पण विद्यापीठ नागपुरात
मुळात कोकणाला ७२0 किमी लांबीचा समुद्रकिनारा असतानाही मत्स्य विद्यापीठ नागपूरमध्ये सुरू करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर त्यावेळी टीका झाली. मात्र, तरीही त्यात बदल झाला नाही. कोकणात मत्स्य विद्यापीठ सुरू करण्यात राजकीय पुढाऱ्यांना अपयशच आले. कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ देण्याबाबत टाळाटाळ करणाºया सर्वच राजकीय पक्षांनी मत्स्य विद्यापीठाबाबतही तेवढीच अक्षम्य टाळाटाळ केली आहे.
भास्कर जाधव म्हणतात, सरकारला जाब विचारणार
जुलै २0१८च्या पावसाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांनी हा प्रश्न मांडला होता. त्यावेळी मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी सभागृहात आश्वासन दिले होते की, हे महाविद्यालय सध्या कोकण कृषी विद्यापीठाशीच जोडलेले राहील आणि लवकरच कोकणाला स्वतंत्र मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ दिले जाईल. या अधिवेशनानंतर भास्कर जाधव यांच्या पायाला दुखापत झाली आणि पुढील दोन अधिवेशनांमध्ये ते उपस्थित राहू शकले नाहीत. आता येणाºया पावसाळी अधिवेशनात आपण या मुद्द्यावर सरकारला जाब विचारू आणि हा विषय मार्गी लावूनच घेऊ, अशी भूमिका आमदार जाधव यांनी घेतली आहे.