सडलेल्या पोषण आहाराची चौकशीही वेळकाढूपणात सडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 01:30 PM2021-02-17T13:30:55+5:302021-02-17T13:32:40+5:30
School kolhapur- रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्याना पुरवठा करण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणांची चौकशी सुरु होते. त्यामुळे ही प्रकरणे बासनात गुंडाळण्यात आले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेल्या या प्रकारांकडे राज्य अन्न आयोग याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्याना पुरवठा करण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणांची चौकशी सुरु होते. त्यामुळे ही प्रकरणे बासनात गुंडाळण्यात आले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेल्या या प्रकारांकडे राज्य अन्न आयोग याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शालेय पोषण आहाराचे धान्य आणि अंगणवाड्यांमधील बालकांना पुरविण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ असल्याचे उघडकीस आल्यानंतरही केवळ चौकशी लावून ते प्रकरण बासनात गुंडाळण्यात येत असल्याचे अनुभव जिल्हावासियांना गेल्या तीन चार वर्षात आले आहेत. त्यामुळे बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या धान्याचे ठेकेदार व पुरवठादार यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील अंगणवाड्यांना महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. चिपळूण तालुक्यातील खडपोली औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्याच्या शेडमध्ये अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणारा पोषण आहाराचा सुमारे २५ टन साठा सडलेल्या अवस्थेत वर्षभरापूर्वी उघडकीस आला होता.
त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार शेखर निकम यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती.. त्यावेळी एकात्मिक बाल विकास योजनेच्या विभागाने गोदाम सील केले तर अन्न व औषध प्रशासनाने निकृष्ट मालाचा पंचनामा केला होता. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
गतवर्षी जुलै महिन्यात रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथील शासकीय गोदामामध्ये अंगणवाड्याना पुरवठा करण्यात येणारे धान्यामध्ये कचरा तसेच ते धान्य निकृष्ठ दर्जाचे असल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी हे गोदामही सील करण्यात आले होते. तसेच अन्न व औषध प्रशासनाला तपासणीचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, हे प्रकरणही दाबण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
चौकशी होत नाही
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे आणि कुवारबांव प्राथमिक शाळेत पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे सापडले होते. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धान्याच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली होती. राजापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे समोर आले होते. पण पुढे काहीच झाले नाही.