गाव दत्तक योजनेंतर्गत १५,४५२ नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:45+5:302021-05-08T04:32:45+5:30
रत्नागिरी : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्हा पाेलीस दलाने दत्तक गाव याेजना राबवण्यास सुरुवात केली आहे़ या याेजनेंतर्गत ...
रत्नागिरी : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्हा पाेलीस दलाने दत्तक गाव याेजना राबवण्यास सुरुवात केली आहे़ या याेजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गावांमधील ग्रामस्थांची पाेलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे़ जिल्ह्यात २८ एप्रिल २०२१ पासून ६ मे पर्यंत १५,४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये ३३ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत़
जिल्ह्यातील ग्रामीण भागातही काेराेनाचे रुग्ण माेठ्या संख्येने आढळत आहेत़ ही वाढती संख्या आटाेक्यात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी दत्तक गाव याेजना अमलात आणली आहे़ पोलीस अधिकारी व कर्मचारी गाव दत्तक घेऊन त्या गावातील ग्रामस्थांची आराेग्य तपासणी करणे, गावामध्ये काेराेनाविषयक जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे़
जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी राजीवडा व अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी कसोप हे गाव दत्तक घेतले आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, लांजा, चिपळूण यातील उपविभागीय पोलीस अधिकारी व १८ पोलीस स्थानकामधील प्रभारी अधिकारी यांनीही गावे दत्तक घेतली आहेत.
पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी प्रत्यक्ष गावात जाऊन गावातील लोकांचे तापमान तपासणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, गावातील लोकांच्या कोरोना चाचण्या वाढवणे या गोष्टींवर पोलीस खात्याने विशेष भर दिला आहे. या उपक्रमासाठी ग्रामकृती दल, वाडी कृती दल, आशा सेविका, तसेच स्थानिक ग्रामस्थही मदत करत आहेत़
फाेटाे ओळ
रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घेतलेल्या दत्तक गावाला भेट देऊन नागरिकांचे तापमान तपासले.