ताैक्तेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:42+5:302021-06-09T04:39:42+5:30
खेड : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नुकतीच केंद्रीय पथकाने खेड तालुक्यातील परिस्थितीची माहिती घेतली. ...
खेड : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नुकतीच केंद्रीय पथकाने खेड तालुक्यातील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याकडून येथील परिस्थितीची माहिती घेतली.
रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने खेड तालुक्यातील लोटे येथील एका हॉटेलमध्ये उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याकडून तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेतला. पंधरा दिवसांपूर्वी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले. वादळ कालावधीत खेडमधील बोरज येथील घोसाळकर वाडी येथे पती-पत्नीचा ३३ हजार व्होल्ट विद्युतभारित तार पडून मृत्यू झाला. तालुक्यात ६८ लाख रुपयांचे नुकसान या वादळामध्ये झाले. या वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात आले आहे.
या पथकात आय.ए.एस. दर्जाचे सहा अधिकारी आहेत. त्यामध्ये पथकाचे प्रमुख केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे संचालक अभय कुमार, अशोक कुमार परमार (आय.ए.एस), तर सदस्य म्हणून अशोक कदम, देवेंद्र चाफेकर, जे. के. राठोड यांचा समावेश आहे. खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी तौक्ते चक्रीवादळाची माहिती पथकाला दिली. हे पथक रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाहणी करून माहिती घेणार आहे.
----------------------
खेड तालुक्यातील लोटे येथे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी स्वागत केले.