नुकसानग्रस्त भागाची पाेलीस अधीक्षकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:33 AM2021-05-18T04:33:17+5:302021-05-18T04:33:17+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड, गणपतीपुळे, मालगुंड या गावांना तौक्ते वादळाचा जोरदार फटका बसला होता. या नुकसानग्रस्त भागाची ...
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड, गणपतीपुळे, मालगुंड या गावांना तौक्ते वादळाचा जोरदार फटका बसला होता. या नुकसानग्रस्त भागाची जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी पाहणी केली. जयगड येथील जेटीवरील बोट बुडाली व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या ठिकाणी डॉ. गर्ग यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा केली व भरपाई लवकरात लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न करेन, असे डॉ. गर्ग यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, उद्यमनगर, शिरगाव या ठिकाणी झाडे व वीजखांब पडून नुकसान झाले होते़ नुकसानीची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मदत केली. तसेच ग्रामीण भागातील निवळी, जाकादेवी, हातीस रोड, कोतवडे या ठिकाणी झाडे व वीजखांब पडून नुकसान झाले़ या ठिकाणी ग्रामीण पाेलिसांनी जाऊन पाहणी केली़
तसेच जिल्ह्यातील चिपळूण, दाभोळ, अलोरे या ठिकाणी झाडे व वीजखांब पडल्याच्या घटना घडल्या़ तेथील पाेलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले. या सर्व ठिकाणी ग्रामस्थांनाही मदत केली.
आंबा घाटामध्ये झाडे पडून रस्ता बंद झाला होता़ ही माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी साखरपा क्षेत्राअंतर्गत घटनास्थळी भेट देऊन जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा केला. सर्व पडझड झालेल्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत करून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले व मानसिक आधार दिला. तसेच सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही दिली.
----------------------
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील साखर मोहल्ला येथे घराची भिंत कोसळल्याची माहिती मिळताच तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी भेट दिली.