पालशेत पुलाची भास्कर जाधव यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:30+5:302021-07-15T04:22:30+5:30
गुहागर : तालुक्यातील पालशेत बाजारपेठेतील पूल अतिवृष्टीमुळे धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. धाेकादायक बनलेल्या या पुलाची ...
गुहागर : तालुक्यातील पालशेत बाजारपेठेतील पूल अतिवृष्टीमुळे धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. धाेकादायक बनलेल्या या पुलाची बुधवारी आमदार भास्कर जाधव यांनी पाहणी करून पुलाची डागडुजी व पर्यायी मार्गाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
तालुक्यातील पालशेत बाजारपेठेमधील पुलाचे दोन खांब कमकुवत झाले आहेत. कोणताही धोका न पत्करता बांधकाम विभागाच्या उपविभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. या पुलाची भास्कर जाधव यांनी पाहणी करून सूचना केल्या. यावेळी तहसीलदार लता धोत्रे, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सलोनी कदम व अधिकारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान भास्कर जाधव म्हणाले की, महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने धोकादायक असलेल्या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. पालशेत गावासाठी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पर्यायी रस्त्यासाठी पाहणी पूर्ण झाली आहे. यासाठी ७० लाख रुपये मंजूर झाले होते. जागा मिळत नसल्याने हा रस्ता झाला नाही याबाबत येथील ग्रामपंचायत सरपंच, इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. भविष्यात या पर्यायी मार्गाबाबत पालशेतवासीयांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी सूचना जाधव यांनी केली.
आमदार जाधव यांनी पुढे सांगितले की, पालशेत पुलाची उंची कमी आहे. भविष्यात नवीन पूल बांधताना ३ मीटरपर्यंत उंची वाढवावी लागेल. हे करताना दोन्हीकडील बाजूने भराव टाकून नव्याने रस्ता करावा लागेल. पावसाचे पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. यातून शक्य असल्यास पुलाला खालच्या बाजूने आधार देऊन पुलावरील वाहतूक सुरळीत होऊ शकेल काय याची पाहणी करण्याचेही त्यांनी सांगितले.
------------------------------------
गुहागर तालुक्यातील पालशेत येथील धाेकादायक पुलाची आमदार भास्कर जाधव यांनी पाहणी केली.