सावर्डे ज्युनियर कॉलेजच्या दोघांना इन्स्पायर शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:25+5:302021-08-26T04:33:25+5:30
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ज्युनिअर विभागातील विज्ञान शाखेच्या अनुप धामणे व ...
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ज्युनिअर विभागातील विज्ञान शाखेच्या अनुप धामणे व अभिषेक भुवड या दोन गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची केंद्र सरकारतर्फे उच्चशिक्षणासाठी स्कॉलरशीप मंजूर झाली आहे. इ. १२ वी मार्च २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेच्या उच्चतम गुण मिळविलेल्या १% विद्यार्थ्यांची या इन्स्पायर स्कॉलरशीपसाठी निवड केली जाते.
विज्ञान शाखेच्या मूलभूत व नैसर्गिक शास्त्र विषयांच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनाच ही स्कॉलरशिप दिली जाते. सावर्डे ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी अनुप धामणे व द्वितीय क्रमांक प्राप्त अभिषेक भुवड या दोन विद्यार्थ्यांना ती मंजूर झाली आहे. प्रतिवर्षी रु. ८० हजारांप्रमाणे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत ५ वर्षांसाठी सदर शिष्यवृत्ती दिली जाते.
बारावी परीक्षेत अनुप धामणे याने ९६.५० टक्के व अभिषेक भुवड याने ९५.६७ टक्के गुण मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील प्राध्यापक विजय चव्हाण, शंकर वारंग, खुशाल बडोले, नीलेशकुमार यादव, शिवलिंग सुपणेकर, महेश गंगावणे, श्रावणी विचारे व महेश घाग यांचे मार्गदर्शन लाभले. सावर्डे ज्युनिअर कॉलेजमधील या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, कार्याध्यक्ष, आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, सर्व संचालक, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर व सभासद, मुख्याध्यापक अन्वर मोडक, उपमुख्याध्यापिका मुग्धा पंडित, पर्यवेक्षक उद्धव तोडकर व ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख विजय चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.