पुनस ग्रामपंचायतीने उभारले संस्थात्मक विलगीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:33+5:302021-06-05T04:23:33+5:30
अनिल कासारे लांजा : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिक आपले गाव सोडून इतर ठिकाणी उपचार करून घेण्यास घाबरत आहेत. ही ...
अनिल कासारे
लांजा : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिक आपले गाव सोडून इतर ठिकाणी उपचार करून घेण्यास घाबरत आहेत. ही बाब लक्षात घेऊन लांजा तालुक्यातील पुनस ग्रामपंचायतीचे सरपंच इलियाज बंदरी यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या सहकार्याने मराठी शाळेतच संस्थात्मक विलगीकरण केंद्र तयार केले आहे. या विलगीकरण केंद्रामुळे ग्रामस्थांना गावातल्या गावातच उपचार घेणे साेईस्कर हाेणार आहे़
पुनस गावामध्ये कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ११३ जणांचे कोरोना स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये बुधवारी आरटीपीसीआर आलेल्या अहवालात १७ जण पाॅझिटिव्ह आले. मात्र, अनेक जण रुग्णालयात जाण्यास घाबरत आहेत़ ग्रामस्थांना गावातच उपचार मिळण्यासाठी सरपंच इलियाज बंदरी यांनी प्रयत्न सुरू केले. गावातील तरुणांनी एकत्र येत कडूवाडी येथील संपूर्ण प्राथमिक मराठी शाळेची साफसफाई करण्यात आली, तसेच तेथे सर्व साेयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. इलियाज बंदरी यांनी मित्र संतोष साळवी, सुशांत पांचाळ यांच्यासह मित्रमंडळींच्या मदतीने ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले. या उपक्रमाला चाकरमानी मंडळींनीही आर्थिक मदतीचा हात दिला.
शाळेतील असलेल्या ६ वर्गखोल्यांमधील ३ वर्गखोल्या या पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी तयार करण्यात आल्या आहेत, तसेच पाॅझिटिव्ह महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या १७ पैकी १३ जणांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एक हजार लिटर पाण्याच्या टाकीतील पाणी अंघोळ, तसेच कपडे धुण्यासाठी, तर पाचशे लिटर टाकीतील पाणी पिण्यासाठी ठेवण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंबू येथून या पाॅझिटिव्ह असलेल्या प्रत्येकाला सहा दिवसांचे औषधाचे किट देण्यात आले आहे. या रुग्णांच्या जेवणाची जबाबदारी विलगीकरणात राहणाऱ्या महिलांनी उचलली आहे़
या सर्व रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विवेक कामत, आरोग्यसेविका सई भुर्के, सुप्रिया बोंबले, आशासेविका शर्वरी वाघाटे, ग्रामसेवक सुबोध कीर, तलाठी वलवी, ग्रामपंचत सदस्य निकेश कडू, सुरेंद्र भागवत, कृतिदल समिती सदस्य, पोलीस पाटील वैदही यादव, शिक्षक सुनील यादव, मनोहर कडू, मंगेश कडू, सुधाकर पांचाळ, प्रकाश गाडे यांच्यासह कडूवाडी, सुतारवाडीतील ग्रामस्थांनीही मदतीचा हात दिला आहे. तहसीलदार समाधान गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे यांनीही संस्थात्मक विलगीकरण केंद्राला गुरुवारी भेट देऊन उपक्रमाचे काैतुक केले.
-----------------------
ग्रामीण भागात उपचार करून घेण्यास ग्रामस्थ नकारात्मक असल्याने कोरोनाची चाचणी करून घेण्यास ग्रामस्थ पुढे येत नाहीत. त्यामुळे आमच्या गावामध्ये कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या ग्रामस्थांचा आत्मविश्वास वाढवा व कोरोनावर मात करण्याचे बळ मिळावे यासाठी गावातील कोरोना रुग्णांना गावातच उपचार व्हावा यासाठी संस्थात्मक विलगीकरण केंद्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
-इलियाज बंदरी, सरपंच
पुनस ग्रामपंचायत