मंजूर निधी पूर्ण खर्च करण्याची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:20+5:302021-07-11T04:22:20+5:30
रत्नागिरी : विविध योजनांसाठी मंजूर निधी पूर्ण खर्च करण्यात यावा. तसेच कामांच्या निविदा प्रक्रिया वेळीच पूर्ण करण्याची सूचना ...
रत्नागिरी : विविध योजनांसाठी मंजूर निधी पूर्ण खर्च करण्यात यावा. तसेच कामांच्या निविदा प्रक्रिया वेळीच पूर्ण करण्याची सूचना नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्व खातेप्रमुखांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, कृषी व पशुसवंर्धन सभापती रेश्मा झगडे, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, सदस्या रचना महाडीक, सदस्य बाळकृष्ण जाधव, संतोष थेराडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, सर्व खातेप्रमुख व राज्य शासन स्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
या सभेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील बंधाऱ्यांच्या अनामत रक्कमा परत करण्याबाबत सदस्यांशी चर्चा कर त्याप्रमाणे कारवाई करण्याची सूचना अध्यक्षांनी दिली. तसेच सदस्यांच्या शिफारशीसह प्राप्त याद्या अध्यक्षांच्या मान्यतेने अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला. समग्र शिक्षणातील अभियंत्यांची रिक्त पदे असल्याने रिक्त पदे भरेपर्यंत पूर्वीप्रमाणेच कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.
दापोलीचे शाखा अभियंता अ. खांचे यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून सभेत देण्यात आली. रिक्त पदे भरणे, नवीन सभागृहातील शिल्लक काम पूर्ण करणे, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही अध्यक्षांनी खातेप्रमुखांना दिल्या. जलजीवन मिशन, जिल्हा परिषर उत्पन्न वाढ, वाहने, निवासस्थाने, नवीन प्रशासकीय इमारत बांधणे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या सहकार्याची माहिती या सभेत देण्यात आल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.