ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा: प्रवीण दरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 06:02 PM2020-10-24T18:02:51+5:302020-10-24T18:04:24+5:30
pravin darekar, Farmer, Khed, Ratnagiri अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करून ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खेड येथे केला. परभणी येथील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचनाची पूर्तता करावी अशी मागणी केली.
खेड : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करून ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खेड येथे केला. परभणी येथील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचनाची पूर्तता करावी अशी मागणी केली.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी दरेकर शुक्रवारी खेड येथे आले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खेड येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी भडगाव येथे नुकसानाची पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले की, दहा हजार कोटींची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची चेष्टा सरकारने केली आहे. जाहीर करण्यात आलेले नुकसान भरपाईचे पॅकेज फसवे आहे. यातील केवळ पाच ते साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद प्रत्यक्षात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
पॅकेजमधील जवळपास निम्मा निधी रस्ते दुरुस्ती, जलसंधारण आदी कामांसाठी देण्यात आला आहे. अशा पध्दतीने भरडलेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी आर्थिक मदत देणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो असेही त्यांनी सांगितले. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करताना जुने निकष अडचणीचे ठरतात यामुळे हे निकष बदलण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
खडसेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस टार्गेट
एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशा विषयी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी खडसेंचा निर्णय योग्य की अयोग्य हे लवकरच कळेल मात्र खडसेंचा खांद्यावर बंदूक ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप केला. खडसे कुटुंबियांना पक्षाने खूप काही दिले आहे अशीही पुस्ती यावेळी जोडली.