सुरुंगाच्या स्फोटाने घरांना धोका निर्माण
By admin | Published: December 30, 2014 09:30 PM2014-12-30T21:30:38+5:302014-12-30T23:35:12+5:30
काळा दगड असल्याने खांदाटपाली गावात चारी बाजूंनी कॉरी व क्रशर सुरु आहेत. स्फोटाच्या दणक्याने गावातील दोन विहिरींना तडे
चिपळूण : तालुक्यातील खांदाटपाली येथे डबर उत्खननासाठी भूसुरूंगाचा वापर होतो. दररोज होणाऱ्या सुरुंगाच्या या स्फोटाने आजूबाजूच्या बहुतांश घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील क्रशर बंद करण्यात यावी, अन्यथा उपोषणास बसू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. येथील विहिरींना तडे गेले असून पाण्याची पातळी त्यामुळे खालावत आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. काळा दगड असल्याने खांदाटपाली गावात चारी बाजूंनी कॉरी व क्रशर सुरु आहेत. स्फोटाच्या दणक्याने गावातील दोन विहिरींना तडे गेले आहेत. खाणीमध्ये अंदाजे दिडशे ते दोनशे मीटरमध्ये ब्लास्टिंग करुन सुरुंग लावले जात आहेत. त्याच्या दणक्याने घरांनाही धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याने वाहून जाणाऱ्या ग्रीटमुळे गावातील ८० टक्के शेतजमीन नापीक झाली आहे. खांदाट येथे दोन कॉरी व क्रशरच्या येथून अंदाजे १०० मीटर अंतरावरुन कोयना ते गुजरात टॉवर लाईन व कोयना ते मुंबई एमआयडीसी टॉवर जात आहे. या टॉवर लाईनला धोका निर्माण झाल्यास जीवित हानीची भीती व्यक्त केली आहे. तहसीलदार वृषाली पाटील, प्रांताधिकारी रवींद्र हजारे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले आहे. (वार्ताहर)
चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली येथे क्रशर सुरु असून, त्याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. हा क्रशर बंद करण्यात यावा, असा ठराव २ डिसेंबर रोजी ग्रामसभेत करण्यात आला आहे. या ठरावावर सूचक म्हणून सुभाष पाटील, तर अनुमोदक म्हणून दिनकर महाडिक यांची नावे आहेत. ठरावाच्या प्रतीवर ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या नावाचा शिक्का आहे.