आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:36+5:302021-05-06T04:33:36+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली ...

Intercropping of amla in mango orchard | आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक

आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वडिलोपार्जित मिठाई व्यवसाय असला तरी आदित्य प्रसन्न गांधी यांनी दाभिळआंबेरे येथे बागायत शेती फुलविली आहे. मिठाई व्यवसायासाठी मदत करीत असतानाच आदित्य यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बागायती शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. आंबा बागेत आवळ्याचे आंतरपीक घेतले असून, दीड टन आवळा उत्पादन त्यांना प्राप्त झाले आहे.

त्यांनी हापूसची १,४०० कलमे लावली असून, वेंगुर्ला ७ या विद्यापीठ प्रमाणित काजूची १,९०० कलमे लावली आहेत, तसेच ६० नारळांची लागवडही केली आहे. हापूस कलमांच्या बागेत संरक्षक भिंतीच्या कडेने शंभर आवळ्याची झाडे लावली आहेत. २००१ साली लागवड केलेल्या आवळ्याचे उत्पन्न सुरू झाले असून, वर्षाला एक ते दीड टन आवळा प्राप्त होत आहे.

शेतीला जोड म्हणून आदित्य यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. एका शेडमध्ये साडेचारशे पक्षी याप्रमाणे आठ शेड उभारले आहेत. त्यांची जिल्ह्यातच विक्री होत आहे. याशिवाय खतासाठी कोंबड्यांची विष्ठाही ते विक्री करीत असून, त्यातूनही उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे.

बागेत जमा होणारा पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारण्यावर त्यांनी भर दिला आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा, काजू, नारळ, आवळा उत्पादनासाठी योग्य नियोजन, कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आदित्य घेत आहेत. यावर्षी हवामानातील बदलामुळे एकूणच उत्पादन कमी असले तरी आदित्य यांच्या बागेतील उत्पन्न व दर्जा चांगला आहे. ते आंबा मुंबई, पुणे येथे विक्रीसाठी पाठवीत आहेत, तर काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. आवळा व नारळासाठी मात्र स्थानिक बाजारपेठेतच चांगली मागणी होत आहे.

सेंद्रिय खत युनिट

सेंद्रिय उत्पादनावर आदित्य यांनी भर दिला आहे. त्यामुळे बागेत पडलेला पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती युनिट उभारणीचे काम सध्या सुरू आहे. सेंद्रिय खतामुळे त्यांच्याकडील उत्पादन व दर्जा राखण्यात त्यांनी यश मिळविले असून, त्यासाठी खतनिर्मिती स्वत:च करणार असल्याचे सांगितले. यापुढे सेंद्रिय खत विकत न आणता, स्वत:च निर्मिती करण्यावर त्यांचा भर आहे.

काजूवर प्रक्रिया

आदित्य यांच्या बागेत १९०० काजू कलमांची लागवड केली असून, साधारणत: वर्षाला आठ ते नऊ टन काजू उत्पादन प्राप्त होते. यावर्षी हवामानातील बदलामुळे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी प्राप्त झाले आहे. मात्र, अखंड काजू बी विक्रीऐवजी काजूवर प्रक्रिया करून विक्री करीत आहेत. त्यासाठी ग्राहकांकडून चांगली मागणी होत आहे. यावर्षी काजू उत्पादनही घटले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आवळा विक्री

आंबा बागेतच आवळ्याचे आंतरपीक घेण्यात येत आहे. आवळा पिकासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. प्रक्रिया व्यावसायिकांकडून आवळ्याला चांगली मागणी असल्याने आवळ्याचा खप हातोहात होतो. आवळ्याचा आकार, दर्जा चांगला असल्याने आंतरपिकातून बऱ्यापैकी उत्पन्न प्राप्त होत आहे. झाडेही लहान असल्याने काढणीही सोपी होत आहे.

Web Title: Intercropping of amla in mango orchard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.