इच्छुक उमेदवार दोन हजार!
By admin | Published: January 17, 2017 11:57 PM2017-01-17T23:57:52+5:302017-01-17T23:57:52+5:30
सर्वपक्षांपुढे पेच निर्माण : जि. प. व पंचायत समिती निवडणूक
रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ व नऊ पंचायत समितींच्या ११0 अशा एकूण १६५ जागांसाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची संख्या तब्बल २ हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांपुढे पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या असून, अन्य पक्षांमध्ये मात्र, अजून त्या पातळीवर शांतता आहे.
जिल्हा परिषद व ९ पंचायत समितींच्या एकूण १६५ जागांसाठी शिवसेनेतून उमेदवारी मिळविण्यासाठी ८०० पेक्षा अधिक कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस, मनसे, बसप आणि इतर पक्षांमधील अनेक कार्यकर्तेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिवसेनेतील इच्छुकांची सर्वाधिक संख्या पाहता चांगल्या उमेदवारांना निवडणूक आखाड्यात उतरवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांत शिवसेनेकडून मुलाखतींचे सत्र सुरू झाले आहे.
भाजपमध्ये ‘इन्कमिंग’ जोरात सुरू आहे. भाजपही स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने जिल्ह्यातील सर्व १७१ जागांवर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले जाणार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसही सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याच्या पवित्र्यात आहे. कॉँग्रेसची जिल्ह्यात फारशी ताकद नसल्याने आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेस फार उत्सुक नाही. इच्छुकांची वाढलेली संख्या ही सर्वच पक्षांच्या वरिष्ठांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)