जिल्हाध्यक्ष झाले आता तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षपदासाठी रस्सीखेच; रत्नागिरीत भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:38 PM2023-08-29T16:38:46+5:302023-08-29T16:39:11+5:30
गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस
रत्नागिरी : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची नियुक्ती केल्यानंतर आता तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तालुकाध्यक्षपदासाठी तीन आणि शहराध्यक्षपदासाठी तीनजण इच्छुक आहेत. या इच्छुकांच्या पक्षनिरीक्षकांकडून मुलाखती घेण्यात आल्या असून, काेणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष आहे.
भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांच्यानंतर राजेश सावंत यांची वर्णी लागली. जिल्हाध्यक्ष बदलानंतर रत्नागिरी तालुका आणि शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. नवीन पदाधिकारी नियुक्तीसाठी नुकत्याच रत्नागिरीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी संघटनमंत्री शैलेश दळवी, प्रभारी महेश जाधव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रभारी अतुल काळसेकर उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदासाठी चांदेराईचे दादा दळी, जयगडचे विवेक सुर्वे आणि निवळीचे भाई जठार यांची इच्छुक उमेदवारांमध्ये नावे आहेत. दादा दळी हे चांदेराई ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यरत होते. विवेक सुर्वे हे माजी पंचायत समिती सदस्य आहेत. सध्या ते उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. निवळीचे भाई जठार हे भाजपमध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. तिघांमध्ये कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
त्याचबराेबर शहराध्यक्षपदासाठी दादा ढेकणे, अमित विलणकर, राजन फाळके यांची नावे इच्छुकांमध्ये आहेत. तिघांपैकी काेणाची वर्णी लागणार, हेच आता पाहायचे आहे.
विस्कटलेली घडी नीट हाेणार?
गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अंतर्गत धुसफूसमुळे बाळ माने समर्थक काहीसे दूर हाेते. त्यामुळे शहरातील पक्षाची घडी विस्कटली हाेती. आता नवीन निवडीनंतर ही विस्कटलेली घडी नीट हाेणार का, हेच पाहायचे आहे.