निवांत भागात रमतात नशेचे उद्योग
By admin | Published: March 15, 2015 10:09 PM2015-03-15T22:09:23+5:302015-03-16T00:15:09+5:30
भीती वाढली : तरुण पिढीचे भवितव्य अंमली पदार्थांच्या हाती
रत्नागिरी : आंबा, काजूसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी शहराला गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचा विळखा पडत असल्याचे चित्र आहे. शहराच्या निवांत भागामध्ये अमली पदार्थांची विक्री राजरोस सुरु असून, परराज्यातून अभियांत्रिकी शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी तसेच स्थानिक तरुणही या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकले असून, अंमली पदार्थांमुळे तरुण पिढी बरबाद होण्याची भिती व्यक्त होत आहे.शैक्षणिक सुविधेबाबत रत्नागिरी आता राज्यातील महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. उच्च शिक्षणाच्या सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. नामवंत शैक्षणिक संस्था रत्नागिरीत असून, राज्यभरातून या शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरी शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे. मात्र शहरालगतच असलेला औद्योगिक वसाहतीचा परिसर शांतशांत बनला असून उद्योगधंदे थंडावल्यामुळे या उद्योगांच्या इमारती आणि परिसर निर्जन बनला आहे. अंमली पदार्थ विक्रेत्यांनी नेमका याच गोष्टीचा फायदा उठवत या निर्जन ठिकाणी अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरु केल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी शहरातील काही ठराविक भागही अंमली पदार्थ विक्रीची केंद्र बनले आहेत.
मध्यंतरीच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थी काही औषधे, तसेच बांधकाम क्षेत्रात वापरली जाणारी काही रसायने यांचा उपयोग नशेसाठी करत असल्याचे दिसून आले होते. अजूनही हे प्रकार सुरु आहेत. त्यातच अफू, गांजासारख्या अंमली पदार्थांची विक्री सुरु झाल्याने तरुण वर्ग अंमली पदार्थांच्या जाळ्यात सापडला आहे. एम. आय. डी. सी. विभागात सायंकाळच्या वेळी निर्जन ठिकाणी तरुण फिरताना दिसून येत आहेत. तसेच अंमली पदार्थ विकणारे लोकही त्या ठिकाणी दिसून येत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. अफू व गांजा हे सिगरेटमध्ये टाकून सिगरेट ओढली जाते व नशा केली जाते, असेही आढळून आले आहे. सिगरेटमधील तंबाखू त्यासाठी काढुन टाकला जातो व त्याजागी अफू, गांजाची पावडर भरली जाते.
रत्नागिरी शहर परिसरात अंमली पदार्थ विक्रीची केंद्र विकसित होत असल्याची चर्चा आहे. या केंद्रांना कोण खतपाणी घालत आहे, बाहेरील या व्यवसायातील कोणते लोक रत्नागिरीतील अंमली पदार्थ व्यवसायात गुंतले आहेत, याबाबत कधी तपास होणार आहे आणि संबंधितांवर कधी कारवाई होणार असा सवाल आता नागरिकांमधून केला जात आहे. (प्रतिनिधी)
अंमली पदार्थांची केंद्र
रत्नागिरी शहरातील राजिवडा, बेलबाग आणि कोकणनगर हे भाग अंमली पदार्थ विक्रीची केंद्र बनली असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे. अंमली पदार्थ विक्रीमध्ये केवळ पुरुषांचाच सहभाग आहे, असे नाही. तर महिलाही या बेकायदा व्यवसायात गुंतल्या आहेत. अन्य राज्यातून अफू, गांजाची आयात होत असल्याची शक्यता आहे. या अफू, गांजाची छोटी पुडी १०० रुपयांपासून पुढे ५०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. त्यामुळे भावी पिढी बरबाद करणाऱ्या या अंमली पदार्थांपासून तरुणांना वाचवण्यासाठी पोलिसांनी दुर्लक्षाचे धोरण सोडावे तसेच सामाजिक संस्थांनीही याबाबत कार्यवाहीसाठी पुढे येण्याची गरज आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय दरम्यानच्या परिसरात हे प्रकार सुरू असल्याचे पुढे येत असल्याने या साऱ्या प्रकाराबद्दल गुंतातगुंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.