रत्नागिरी पोलिस दलातील ६१ कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या; तत्काळ हजर व्हा
By अरुण आडिवरेकर | Published: May 20, 2023 04:56 PM2023-05-20T16:56:06+5:302023-05-20T16:56:14+5:30
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.
रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील ६१ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले आहेत. बदली झालेल्या ६१ जणांमध्ये पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हवालदार यांचा समावेश आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.
जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत जिल्हाअंतर्गत बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. ६१ जणांच्या बदल्यांचे आदेश काढताना बदली झालेल्या अंमलदार यांनी त्यांच्याकडे असलेले गुन्हे आणि अर्ज प्रकरणे नेमणुकीच्या इतर पोलिस अंमलदार यांच्याकडे देऊन त्यांची नोंद ठेवावी. तसेच बदली झालेल्या अंमलदार यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिले आहेत. बदली झालेल्या अंमलदार यांना तत्काळ कार्यमुक्त न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
बदली झालेल्या ६१ जणांमध्ये संदेश सारंग यांची शहर पोलिस स्थानकातून पोलिस मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. शरद भागवत यांची शहर वाहतूक शाखा येथून शहर पोलिस स्थानक येथे नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी निखार्गे यांची पोलिस मुख्यालय येथून रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानक, प्रभाकर बोरकर यांची स्थानिक गुन्हे शाखेतून सुरक्षा शाखा, संजय कांबळे स्थानिक गुन्हे शाखेतून जिल्हा विशेष शाखा, राजेश सावंत यांची पोलिस मुख्यालय येथून रत्नागिरी ग्रामीण, प्रवीण बर्गे यांची शहर पोलिस स्थानक येथून राजापूर पोलिस स्थानक येथे बदली झाली आहे.