खोक्याला बळी पडले नाहीत म्हणूनच चौकशी, खासदार विनायक राऊतांचा आरोप
By अरुण आडिवरेकर | Published: October 14, 2022 12:12 PM2022-10-14T12:12:47+5:302022-10-14T13:26:42+5:30
कितीही एसीबी लावा, एलसीबी लावा, सीबीआय लावा, ईडी लावा वैभव नाईक आणि राजन साळवी हे दबावाला बळी पडणार नाहीत
रत्नागिरी : वैभव नाईक, राजन साळवी हे मातोश्रीचे प्रामाणिक शिलेदार आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते यांच्या खोक्याला बळी पडले नाहीत. त्यांनी निष्ठा, श्रद्धा जपली आणि खाल्ल्या मिठाला ते जागले आहेत. खोक्याला दबले नाहीत म्हणून कोणत्या ना कोणत्या एजन्सीचा दबाव टाकायचा. २००२ पासूनचे व्यवहार तपासायचे, कटकारस्थान करायचे हे अत्यंत खाणेरड राजकारण आहे, असे मत रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी खासदार विनायक राऊत आज, शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, असे तुम्ही कितीही एसीबी लावा, एलसीबी लावा, सीबीआय लावा, ईडी लावा वैभव नाईक आणि राजन साळवी हे दबावाला बळी पडणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे १८ ऑक्टोबर रोजी शिवसैनिकांनी मोर्चाचे आयोजन केल्याचे खासदार राऊत म्हणाले.
मुलांनाही सोबत घेऊन जा
नारायण राणे यांना दक्षिण मुंबईची जबाबदारी दिली आहे, त्यावर खासदार राऊत म्हणाले की, ज्यांनी जबाबदारी दिली त्यांचे मी आभार मानतो. नारायण राणे आणि पनवती हे समीकरण यापूर्वी मुंबई, सिंधुदुर्गात दिसून आली आहे. पुन्हा दिसेल. बरोबर दोघांनाही घ्या, एकटल्यालाच नको बापाबरोबर दोन्ही बेट्यांनाही घ्या, असे खोचकपणे सांगितले.
अवधूत तटकरेंचा शिवसेनेशी संबंध नाही
अवधूत तटकरे आणि शिवसेना यांचा काहीही संबंध नाही. त्यांना आमचे मानत नाही ना त्यांनी शिवसेनेला आपल मानलं. शिवसेनेच लेबल लावून भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर तो त्यांच्या समाधानाचा विषय असेल.