नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:32 AM2021-05-11T04:32:53+5:302021-05-11T04:32:53+5:30

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७ लाख ९८ ...

Investigation of citizens | नागरिकांची तपासणी

नागरिकांची तपासणी

Next

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७ लाख ९८ हजार ८५६ नागरिकांची गृहभेटीतून तपासणी करण्यात आली आहे. यातून ५९७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तपासणीमुळे निदान वेळेत होत आहे.

लसीकरणात गोंधळ

लांजा : अजूनही लसींसाठी पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. काही नागरिकांना पहिला डोस अद्याप झालेला नाही, तर पहिला डोस झाल्यानंतर सुमारे ६ आठवडे ओलांडूनही अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पुरेशी लस कधी येणार, असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.

वाहनांची गती संथ

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भरणे येथे भुयारी मार्गाचे काम सध्या सुरु आहे. या कामासाठी आंबवलीकडे जाणारा मार्ग मध्यवर्ती ठिकाणी बंद करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी एकेरी मार्गाचा अवलंब आणि अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने अडचण होत आहे.

धुळीने केले त्रस्त

सावर्डे : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या मार्गावर सध्या धुळीचा त्रास होत आहे. धुळीचे लोळ निर्माण होत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. याबाबत ठेकेदार व्यवस्थापनाकडे सातत्याने तक्रार करूनही याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

तिसऱ्या लाटेचा धसका

दापोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळ्यांच्या मनात धडकी भरविली आहे. अजूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी येत नसल्याने आरोग्य विभाग त्रस्त झाला आहे. अशातच आता पुन्हा तिसऱ्या लाटेचे सुतोवाच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. त्यामुळे दुसरी लाट थांबण्याआधीच तिसऱ्या लाटेचा धसका नागरिकांनी घेतला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या २५ हजारपेक्षा अधिक झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सध्या साडेचार हजारपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण येत होता. परंतु आता कंत्राटी कर्मचारी यांची भरती करण्यात आल्याने यंत्रणेला हातभार लागला आहे.

गणेश मोरेंचा गौरव

आवाशी : खेड तालुक्यातील चिंचघर गडाचे पंचायत समिती सदस्य यांनी काव्यलेखन उपक्रमात काव्यलेखन केल्याने त्यांचा सन्मानपत्राने नुकताच गौरव करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंचच्यावतीने हा उपक्रम आयोजित केला होता. ‘मी एक भारतीय नागरिक’ यावर मोरे यांनी कव्यलेखन केले.

कारवाईची मागणी

देवरुख : कोरोना काळात शासनाकडून निर्बंधांचे आदेश असतानाही संगमेश्वर तालुक्यातील माखजन, धामापूर भागात चिरेखाण व्यवसाय बेकायदा सुरू आहे. या चिरेखाणीवर काम करणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी तसेच या व्यवसायावर कारवाई व्हावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.

Web Title: Investigation of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.