नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:32 AM2021-05-11T04:32:59+5:302021-05-11T04:32:59+5:30
कर्जमाफीची मागणी रत्नागिरी : गेली दोन-तीन वर्षे मासळीचा दुष्काळ तसेच ऐन मासेमारी हंगामात सतत येणारी वादळे, समुद्रात होत असलेली ...
कर्जमाफीची मागणी
रत्नागिरी : गेली दोन-तीन वर्षे मासळीचा दुष्काळ तसेच ऐन मासेमारी हंगामात सतत येणारी वादळे, समुद्रात होत असलेली बेकायदेशीर मासेमारी, डिझेलचे भरमसाठ वाढलेले दर यामुळे मच्छीमार संकटात आले आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी मच्छीमारांमधून केली जात आहे.
लसीकरणाची मागणी
रत्नागिरी : शहरात प्रभागनिहाय लसीकरण करून लसीकरणाची जबाबदारी नगरसेवकांकडे सोपवावी. ज्या पद्धतीने निवडणुका पार पडतात त्याच धर्तीवर लसीकरण करण्याची मागणी राधाकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष अजय गांधी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. शहर परिसरासह संपूर्ण रत्नागिरीतील लसीकरणामध्ये गोंधळ होत आहे.
मास्कचे वाटप
रत्नागिरी : फिनोलेक्स उद्योग समूहाचे संस्थापक (कै.) प्रल्हाद छाब्रिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त फिनोलेक्स कामगार संघटनेतर्फे कोरोना कालावधीत विशेष परिश्रम घेणाऱ्या कोरोनायोद्ध्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक तानाजी काकडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजित पाडाळकर, जनरल सेक्रेटरी सचिन गोरे उपस्थित होते.
पाणीटंचाईवर मात
खेड : तालुक्यातील चोरवणे - जखमेची वाडीतील ग्रामस्थांना दरवर्षी सतावणारी पाणीटंचाईची समस्या लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत कायमची निकाली निघाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ग्रामस्थांना करावी लागणारी पायपीट थांबली आहे.
सर्वेक्षण ९० टक्के पूर्ण
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी गावात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाचे सर्वेक्षण ९० टक्के पूर्ण झाले आहे. गावात सहा पथकांनी हे सर्वेक्षण पूर्ण केले. गेले तीन दिवस सर्वेक्षण सुरू होते. बारा वाड्यातील घरोघरी जाऊन ग्रामस्थांचे तापमान, ऑक्सिजन पातळी, वॉकटेस्ट घेण्यात आली.
ऑनलाइन बैठक
खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा युवा सेनेची ऑनलाइन बैठक युवा सेना सचिव सूरज चव्हाण, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. युवा जिल्हाध्यक्ष अजिंक्य मोरे यांनी १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी केंद्र वाढविण्याची मागणी केली.