राज्यात दोन वर्षात पाच लाख कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
By मनोज मुळ्ये | Published: August 30, 2024 03:40 PM2024-08-30T15:40:02+5:302024-08-30T15:42:06+5:30
'फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधकांना केंद्र सरकारने चपराक दिली'
रत्नागिरी : महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत गेली दोन वर्षे अविश्वासाचे वातावरण तयार केले गेले. मात्र महाराष्ट्रातून कोणतेच प्रकल्प गेले नाहीत. उलट दोन वर्षात पाच लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली आहे आणि तीन वर्षांनी राज्य सलग दोन वर्षे उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आले आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.
रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या आसपास पाच हजार कोटी रुपये खर्च करुन औद्योगिक शहर वसवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल मंत्री सामंत यांनी कोकणाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या औद्योगिक शहरात प्राथमिक गुंतवणूक ३८ हजार कोटी रुपयांची आहे. त्यातून १ लाख १४ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. तेथील प्रकल्प सुरू होईपर्यंत हजारो लोकांना अप्रत्यक्ष रोजगारही उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकार उद्योग विभागामार्फत राज्याला काही देत नाही, असा फेक नरेटिव्ह विरोधक पसरवतात. मात्र त्याला केंद्र सरकारने चपराक दिली आहे, असे ते म्हणाले. दिघी येथून आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वेसह सागरी वाहतूकही जवळ आहे. त्यामुळे कोकणाची आर्थिक उन्नत्ती होईल, असेही त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. देशातील पहिल्या क्रमांकाचे हे बंदर असेल. त्यामुळे याचा परिणाम देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होईल. गुंतवणूक वाढेल आणि त्यातून कोकणातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.