निमंत्रितांचे कवी संमेलन रंगले
By Admin | Published: December 1, 2014 10:36 PM2014-12-01T22:36:03+5:302014-12-02T00:25:01+5:30
साहित्य संमेलन : दुसरा दिवस निमंत्रितांच्या कवितांनी रंगला
गुहागर : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागर आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी निमंत्रितांचे कवी संमेलन या अखेरच्या कार्यक्रमात दापोलीच्या सुनील कदम व रश्मी कशेळकर यांनी सादर केलेल्या कवितांनी विशेष दाद मिळवली.सुनील कदम यानी प्रथम दत्त्या मामा काय चुतीचासारखा सनई वाजवतात, या कवितेने उपस्थित ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी कदम यांचा विशेष सत्कार केला. कवितेची वेगळी शब्दशैली सादर करण्याची अनोखी पद्धत बागवे यांनी विशेष प्रशंसा केल्यानंतर आजच्या काळातील शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी (शिव जयंती) व नाव घेऊन चाललेले राजकारण यावर भाष्य करणाऱ्या राजे या कवितेमधून शिवाजी महाराजांवर आकाशातून पाहात असतील तर कधी कुणाकडून नाही, तर बुद्धिवाद्यांकडून हरलो, अशा शब्दांत कळकळीने कैफियत मांडली.
रश्मी कशेळकर या उपस्थित एकमेव महिला कवयित्रीने आपणही काही कमी नाही, असे दाखवत सिंधुदुर्गच्या मालवणी ठसक्यामध्ये आंबा बागायतदार या कवितेमध्ये विदर्भ, मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्या तुलनेमध्ये कोकणचा शेतकरी व खासकरुन आंबा बागायतदार संकटकाळीही न डगमगता कसा धीटपणे समोरील परिस्थितीला सामोरा जातो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
संमेलनाचे सूत्रसंचालक कैलास गांधी (दापोली) यांनी झोपणाऱ्या पावलांना ठणकणारी ठेच दे कविता सादर केली. विशाल इंगवले (बुलडाणा) यांनी ओझं, राष्ट्रपाल सावंत (गुहागर) यांनी आई या कवितेमधून आईच्या व्यथा व मन उलगडण्याचा प्रयत्न केला. तसेच हनुमंत चांदिवडे (बारामती), मंगेश मोरे (दापोली), नारायण लाळे (मुंबई) यांनी विविध विषयावर कविता सादर केल्या.
कार्यक़्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रकाश घोडके यांनी उभा जन्म माझा उन्हाळा उन्हाळा, तुझ्या दाराहून जाता व गढूळल्या दाहीदिशा कटू झाली सारी वाणी ही प्रदूषण नामक कविता सादर केली. कार्यक़्रमाच्या शेवटी विशेष मागणीवरुन संमेलनाचे अध्यक्ष अशोक बागवे यांनी प्रतिबिंबाने सूर्याच्या का नदी कोरडी होते ही कविता सादर केली. कवी हलगारे यांनी आभार मानले. एकंदर हे कवी संमेलन नवोदितांच्या उपस्थितीनेही रंगले. (प्रतिनिधी)
मसापच्या गुहागर साहित्य संमेलनात कवी संमेलन गाजले.
कशेळखर, कदम, सावंत, गांधी यांच्या कवितांनी रसिकांवर जादू.
मालवणी ठसक्यातील कविता रंगतदार.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कविता.
कोकणच्या शेतकऱ्याच्या धैर्याची वाखाणणी.