उपविभागीय स्तरावरील कामांच्या निविदांमध्ये अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:23+5:302021-09-27T04:34:23+5:30
अडरे : मागील तीन वर्षे रत्नागिरी उपविभागाअंतर्गत विकासकामांच्या निविदांमधील अनियमिततेबाबत संघटनेने वेळोवळी पत्रव्यवहार केला व आपल्या कार्यालयात झालेल्या ...
अडरे : मागील तीन वर्षे रत्नागिरी उपविभागाअंतर्गत विकासकामांच्या निविदांमधील अनियमिततेबाबत संघटनेने वेळोवळी पत्रव्यवहार केला व आपल्या कार्यालयात झालेल्या चर्चेमध्ये आपण निविदांमध्ये होणारी अनियमितता मान्य करुन त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत लेखी पत्र दिले होते. उपविभागीय स्तरावरील कामांच्या निविदांमध्ये होणाऱ्या अनियमितता व भ्रष्टाचार या कारभाराबाबत सुधारणा करावी, सुधारणा न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनने बांधकाम विभागाच्या रत्नागिरी उपअभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
उपविभागीय कार्यालयाकडून निविदा प्रक्रियेमध्ये निविदा नोटीस उपविभागीय कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येत नाही, किंबहुना कार्यालयात तसा नोटीस बोर्ड उपलब्ध नाही. निविदा मॅनेज करण्यासाठी आपल्या कार्यालयाकडून ३ टक्के प्रति निविदा रक्कम मक्तेदारांकडे मागणी करण्यात येते. ठराविक रजिस्ट्रेशनचाच वापर यासाठी केला जातो व अशा रजिस्ट्रेशन वापरण्यात आलेल्या ठेकेदारांकडून काम नावावर टाकण्याच्या मोबदल्यात अजून २ टक्के ते ३ टक्के मागितले जातात. नियमानुसार निविदा भरली जात नाही, नियमानुसार कार्यारंभ आदेश देताना भरले जात नाही आदी त्रुटींचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.
निविदा प्रक्रियेबाबत वरील सर्व बाबींची दखल घेऊन संबंधितांवर कार्यवाही करावी व निविदा प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी, अन्यथा संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रणजित डांगे यांनी दिला आहे.