पाटबंधारे विभागाकडून राजापूर शहरातील पूररेषेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:32+5:302021-06-02T04:24:32+5:30
राजापूर : राजापूर शहरातील पूररेषेची आखणी यापूर्वी सन २००८ मध्ये झाली असतानाच पाटबंधारे विभागाच्या वेबसाईटवर त्या पूररेषेत बदल करून ...
राजापूर : राजापूर शहरातील पूररेषेची आखणी यापूर्वी सन २००८ मध्ये झाली असतानाच पाटबंधारे विभागाच्या वेबसाईटवर त्या पूररेषेत बदल करून चुकीच्या पद्धतीने तिची नोंद करण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी आक्षेप घेतला आहे. या संदर्भात त्यांनी रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून हरकत घेऊन सुधारित पूररेषा रद्द करण्याची मागणी केली आहे़
राजापूर शहराला दरवर्षी पुराचा मोठा फटका बसतो व त्यामध्ये सर्व व्यवहार ठप्प होतात. यापूर्वी शहराला बसलेल्या प्रत्येक पुराचा फटका लक्षात घेऊन शासनाने सन २००८ मध्ये राजापूर शहर पूररेषेची आखणी केली होती. पाटबंधारे विभागाकडून ती करण्यात आली होती. शिवाय सुधारित शहर विकास आराखड्यात ती दर्शविण्यात आली होती. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या वेबसाईटवर त्या पूररेषेत बदल करून सुधारित पूररेषा प्रसिद्ध केली आहे. सुधारित पूररेषा चुकीच्या रीतीने प्रसिद्ध झाली असून, ज्या परिसराला पुराचा कधीच फटका बसला नव्हता त्या क्षेत्राचा पूररेषेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात सुधारित पूररेषा शहरवासीयांना उपद्रवी ठरणार आहे. शहराची सुधारित पूररेषा बनविताना राजापूर नगर परिषदेसह येथील नागरिकांनाही कुठल्याच प्रकारची कल्पना देण्यात आलेली नाही, असे ॲड. जमीर खलिफे यांनी म्हटले आहे. सुधारित पूररेषेमुळे नागरिकांना नाहक उपद्रव होणार असून, ती तत्काळ रद्द करण्यात यावी. तसेच यापुढे नवीन सर्वेक्षणाचे काम करताना नगर परिषद व नागरिक यांना कल्पना दिली जावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.