..त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना, योगेश कदमांच्या अपघातावरुन रामदास कदमांनी व्यक्त केला संशय
By मनोज मुळ्ये | Published: January 7, 2023 05:39 PM2023-01-07T17:39:42+5:302023-01-07T17:40:31+5:30
..त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपात
खेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल, शुक्रवारी रात्री टँकरने ठोकर देऊन झालेला अपघात हा घातपाताचा प्रयत्न होता, असा संशय बाळासाहेबांची शिवसेना नेते रामदास कदम व्यक्त केला आहे. आज, शनिवार (दि. ७) खेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार योगेश कदम यांचा शुक्रवारी दि. ६ रोजी रात्री कशेडी घाटात अपघात झाला. या अपघातात ते बचावले. अपघाताबाबत संशय व्यक्त करताना रामदास कदम म्हणाले की, रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे घटनेच्या सखोल चौकशीची मागणी आपण केली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या पुढे व पाठीमागे पोलिसांचे वाहन असतानाही टँकरने पोलीस गाडीला ओव्हरटेक करून आमदारांच्या गाडीला पाठीमागून ठोकरले कसे? हा प्रकार संशयास्पद वाटतो.
उद्धव ठाकरेंचा परबांच्या माध्यमातून कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न
यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दापोली मतदार संघातील जनता आमदार कदम यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे हा अपघात म्हणजे त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना असा माझ्या मनामध्ये संशय आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
..त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपात
या अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. तो अद्याप फरार असल्याचे समजते, त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपात वाटत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान आमदार योगेश कदम यांनीही माध्यमांशी बोलताना या घटनेची चौकशी झाली पाहिजे असे नमूद केले.