नांदिवडेतील ‘विलगीकरण कक्ष’ ठरला रुग्णांसाठी नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:27+5:302021-06-25T04:22:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गाव-खेड्यांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर भार कमी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गाव-खेड्यांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर भार कमी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडेतील सरपंच, उपसरपंच आणि गावकऱ्यांनी मिळून विलगीकरण कक्ष उभारला आहे. लोकांसाठी लोकसहभागातून सुरू केलेला हा विलगीकरण कक्ष अनेक गोरगरीब रुग्णांसाठी फायद्याचा ठरत आहे. या कक्षातून आतापर्यंत ७२ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत.
रत्नागिरी तालुका कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. रुग्णालये फुल्ल झाल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी नांदिवडे गावात १२ मे राेजी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. जयगड पंचक्रोशीत कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक होत चालली असताना स्थानिक ग्रामपंचायतीने पुढाकार घेत विलगीकरण कक्ष सुरू केला. गरीब ग्रामीण जनतेला शहरात येऊन उपचार खर्च परवडणारा नसल्याने उपसरपंच विवेक सुर्वे यांनी जयगड हायस्कूलमध्ये कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य केंद्र, खंडाळाचे सर्व कर्मचारी आणि डॉ. श्रुती कदम, डॉ. आशय जोशी, डॉ. जोग यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले. विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आपुलकीची सेवा मिळत आहे. नांदिवडे, कचरे, संदखोल, कासारी, सांडेलावगण, जयगड येथील रुग्णांना या केंद्राचा फायदा होत आहे. या विलगीकरण कक्षामुळे जयगड पंचक्रोशीतील साथ आटोक्यात येण्यास मदत होत आहे.
विलगीकरण कक्षामध्ये दाखल प्रत्येक रुग्णासाठी उपसरपंच विवेक सुर्वे यांच्या घरामधून रोजचे दोनवेळेचे जेवण दिले जाते तसेच सरपंच आर्या गडदे यांच्याकडून दोनवेळचा नाष्टा दिला जातो. विशेष म्हणजे ग्राम कृती दलामधील प्रसाद गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष संकेत मेने, ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र आडाव, ग्रामपंचायत कर्मचारी संगीता बंडबे, आशा सेविका हे विलगीकरण कक्षामध्ये दाखल हाेणाऱ्या प्रत्येकी रुग्णाची काळजी घेतात. या उपक्रमाला भगवान शिरधनकर आणि चंद्रहास आडाव या दोन पोलीसपाटलांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
-------------------------
जिंदल कंपनीकडून २४ तास रुग्णवाहिका सेवा
या विलगीकरण कक्षामध्ये रूग्णांना दाखल करण्यासाठी जिंदल कंपनीने २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. विलगीकरण कक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला ही मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दोन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर दिले आहेत.