महामारीमध्ये गैरसमज पसरविणे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:06+5:302021-04-22T04:32:06+5:30
कोरोना ही जागतिक महामारी ठरली आहे. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी सुटकेचा श्वास टाकला होता. कोरोनामुळे अनेकांचे ...
कोरोना ही जागतिक महामारी ठरली आहे. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी सुटकेचा श्वास टाकला होता. कोरोनामुळे अनेकांचे कुटुंबच्या कुटुंब, संसार उद्ध्वस्त झाले. कोणाच्या घरातून कमावता आधार गेला तर कोणाचे आई-वडील, कोणाचा मुलगा, तर कोणाचा भाऊ, तर कोणाची अर्धांगिनी गेली. त्यामुळे कोरोनाने अनेकांचे जीवनच उद्ध्वस्त झाले. संसार उघड्यावर आल्याने काही नशिबाला दोष देत आहेत, तर काहीजण हा निसर्गाचा प्रकोप असल्याचे सांगून आपल्या जीवनाची गाडी पुढे ढकलत आहेत. त्यामुळे वर्षभर बहुतांश लोक कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. काहीजण या कोरोना महामारीचा गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून स्वत:चे खिसे कसे भरणार, या विचारात मग्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाने अनेकांना मारलं, तर काहींना तारलं, असेच म्हटले जात आहे. अर्थात यात उद्ध्वस्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
ज्याच्या-त्याच्या तोंडी कोरोना हा एकमेव शब्द असला तरी त्यामध्ये दहशत, भीती असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलेही मोठ्यांचे ऐकून आपल्या पाल्यांना, घरातील माेठ्यांना, ‘कोरोना बाहेर आहे, जाऊ नका’, असे सांगताना दिसतात. त्यांना कोरोना काय हे माहीतही नसेल. मात्र, ज्यांना कोरोना काय आहे, हे समजूनही आजची परिस्थिती रस्त्यावर पाहावयास मिळत आहे, कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवले असताना, अनेकजण अतिशहाण्यासारखे वागताना दिसतात. कारण नसतानाही रस्त्यावर फिरताना दिसतात. त्याचा त्रास प्रशासनाला होतो, हे निश्चित आहे. कारण पोलीस भर उन्हात दिवसभर लोकांच्या संरक्षणासाठी राबताना त्यांना दिसत नसतील, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना काय म्हणायचं. गुराढोरांसारखं वागत असतील, तर ही कसली माणसं, असेच म्हणावे लागेल. या महामारीमध्ये लोक मरताहेत, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर १२-१२ तास, तर वेळ पडल्यास २४ तास काम करून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना साथ देण्याऐवजी बिनधास्तपणे कसलीही तमा न बाळगता काहींनी विनाकारण आपले फिरती सत्र पुढेच सुरू ठेवल्याचे दिसून येते.
कोरोना महामारीमध्ये वर्षभरात अनेक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक तसेच इतर कर्मचारी आणि लोकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे या दुसऱ्या लाटेत शासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्या करताना फायदा कमीच, पण न भरून येणारे नुकसान होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये हातावर पोट असणाऱ्यांचे तर मोठे हाल होत आहेत.
सध्या तर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या पाहता कर्मचारी, डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे. ही संख्या भरून काढण्यासाठी शासनाकडून जाहिरातबाजी करून ती भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यासाठी पुढे येण्याचे प्रमाणही कमी असल्याने अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच साेशल मीडियावरून कोरोनाबाबत समज-गैरसमज पसरविले जात आहेत. गैरसमज पसरविणाऱ्यांना रोखण्यासाठी आता लोकांनीच पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वागल्यास गैरसमज पसरणार नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीवर विजय मिळवता येईल.