नितीन गडकरींना 'याचे' वाटतं दु:ख, रत्नागिरीत बोलून दाखवली मनातली खंत
By मनोज मुळ्ये | Published: March 30, 2023 04:27 PM2023-03-30T16:27:26+5:302023-03-30T16:34:03+5:30
आतापर्यंत देशात एक लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे
रत्नागिरी : आतापर्यंत देशात एक लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली. सर्व कामे अत्यंत वेळेत झाली. केवळ मुंबई गोवा महामार्गाचे कामच खूप काळ रखडले. सर्वाधिक वेळ लागलेले हे एकमेव काम आहे. हा रस्ता वेळेत झाला नाही, याचे दु:ख आपल्याला नेहमी वाटते, अशी खंत केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी एमआयडीसी येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या कामाचा पूर्ण आढावा घेतला. २०११ साली या रस्त्याला मंजुरी मिळाली. २०१६ साली वनखात्याची परवानगी मिळल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. काहीवेळा ठेकेदार बदलावे लागले, भूसंपादन, मोबदला वाटप, न्यायालयात दाखल झालेले दावे अशा अनेक कारणांमुळे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लांबले. या मार्गावर खूप अपघात होतात. अनेकांचे बळी आतापर्यंत गेले आहेत. त्यामुळे हे काम लवकर होणे अपेक्षित आहे. मात्र ते वेळेत झाले नाही, याचे आपल्याला दु:ख वाटतं, असे ते म्हणाले.
प्रलंबित कामांसाठी २२० कोटींचा निधी
विविध कारणांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन टप्प्यातील काम रखडले आहे. आता त्यालाही गती आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल आणि जानेवारीमध्ये कोकणवासीय नव्या महामार्गावरुन जातील, असे मंत्री गडकरी यांनी जाहीर केले. तसेच मार्गातील काही प्रलंबित कामांसाठी २२० कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी केली.