वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा पावसाळ्यापूर्वी अशक्यच!, पाऊस पडताच काम थांबणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:40 PM2022-05-17T17:40:53+5:302022-05-17T17:41:42+5:30
सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.
संदीप बांद्रे
चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीतील सुमारे ७ लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, गाळ काढण्याच्या अखेरच्या टप्प्यात कामाची गती थंडावली आहे. आत्तापर्यंत ४ लाख ४५ हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी गाळाचे उद्दिष्ट पूर्ण होणे अशक्य बनले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. पण, गाळ टाकण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चिपळूण शहर पूरमुक्त होण्यासाठी एक पर्याय म्हणून वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. त्यासाठी चिपळूणवासीयांना तब्बल महिनाभर साखळी उपोषण छेडावे लागले. त्यानंतर चिपळुणात गाळ काढण्याच्या कामाला सारी यंत्रणा लागली होती. सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात डिझेल चोरीचा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी अद्याप काेणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, डिझेल चोरीच्या भानगडी उघड झाल्यावर चालकांची कमतरता जाणवली. टिपर चालकांना प्रति महिना सुमारे १४ ते १५ हजार अथवा प्रतिदिन ५०० रुपये वेतन मिळते. हे वेतनही महिन्याकाठी वेळेत मिळत नाही. कंत्राटी स्वरूपात चालक घेतले जातात. डिझेल चोरीच्या घटना, त्यातच कोणीही येऊन चालकांना शिव्या देणे, दमदाटी करणे आणि काम नियमित नसल्याने कामात अडथळे आले.
येथील गाळ काढण्याचे काम यापुढे पावसाळा सुरू होईपर्यंत अर्थात १५ ते २० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तेवढ्या दिवसांकरिता कोणी चालक मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सुमारे १२ ते १५ डंपर चालकांअभावी उभे आहेत. त्यामुळे कामाची गती मंदावली आहे. मात्र, नाम फाऊंडेशनने शिवनदीतील बहुतांशी गाळ काढण्याचे काम पूर्ण केल्याने नदीने मोकळा श्वास घेतला आहे. वाशिष्ठीतील कामासाठी मात्र अजून बराच वेळ जाणार हे स्पष्ट आहे.
अंतिम टप्प्यात लगबग
अखेरच्या टप्प्यात चोवीस तास काम सुरू ठेवण्याची हमी जलसंपदा विभाग कोकणचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दिली होती. सुरुवातीला आणलेली यंत्रणा अन्यत्र हलविण्यात आली. चालक नसल्यानेही काही यंत्रणा पडून आहे. तुर्तास बहादूरशेख नाका गाळ उपाशाचे काम पूर्ण झाले असले तरी पेठमाप व उक्ताडला मोजकीच यंत्रणा कार्यरत आहे.
गाळासाठी जागेचा तुटवडा
वाशिष्ठी व शिवनदीतील काढलेला गाळ नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, पूरबाधित भागात गाळ न टाकण्याची अट घातली. परिणामी याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील शासकीय व सार्वजनिक जागाही गाळाने भरल्या आहेत. शासकीय जागा शोधून तेथे गाळ टाकावा लागतो आहे. सद्यस्थितीत कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत गाळ टाकला जात आहे. मात्र, काही गाळ १० ते १२ किलोमीटर अंतरावर नेऊन टाकावा लागत आहे.