रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे गरजेचे

By शोभना कांबळे | Published: August 23, 2023 03:36 PM2023-08-23T15:36:49+5:302023-08-23T15:37:03+5:30

जिल्हा न्यायालयात आयोजित वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात मान्यवरांनी केले विचार व्यक्त 

It is necessary to develop self-discipline among people for road safety | रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे गरजेचे

रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे गरजेचे

googlenewsNext

रत्नागिरी : केवळ शिक्षा करून, कारवाया करून वाहतूक शिस्तीचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण हाेणे, लोकांनी स्वत:हून आपली व इतरांचीही सुरक्षितता सांभाळली पाहिजे. यादृष्टीने त्यांच्यात जागृती होणे गरजेचे असल्याचे मत वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.

जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य न्याय दंडाधिकारी राहूल चाैत्रे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हनकर, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर आणि वकील बार संघाचे अध्यक्ष दिलीप धारिया, सरकारी वकील अनिरूद्ध फणसेकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.

प्रारंभी प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीचे होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू हे केवळ आणि केवळ हेल्मेट न घातल्याने होत असल्याचे दिसून येते. युवा पिढी ही देशाचे भवितव्य असल्याने या पिढीने हेल्मेट घातलेच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हनकर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध जागृतीचे उपक्रम राबवीत असल्याने अपघातांची संख्या ३० टक्केपर्यंत खाली असल्याचे सांगितले. या कार्यालयाकडून सातत्याने जागृतीचे उपक्रम राबवीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

धनंजय कुलकर्णी यांनी न्यायाधीशांनीच महत्वाचे काम हाती घेतल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला धन्यवाद दिले. ते म्हणाले केवळ, दंड, चालान भरून, कारवाया करून दरवर्षी प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त - जागृती होणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी वाहन चालविताना शरीर गाडीवर आणि मन दुसरीकडे भरकटत स्पष्ट केले. नागरिकांमध्ये काॅमन सेन्स असणे गरजेचे आहेत. वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण होण्याची गरज ज्यांनी व्यक्त केली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात समाजातील सर्वच घटकांकडून याबाबत जागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सह दिवाणी न्यायाधीश आर. बी. यादव यांनी आभारप्रदर्शन केले.

Web Title: It is necessary to develop self-discipline among people for road safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.