संगमेश्वरातील मच्छी विक्रेत्या महिलेचा खून झाल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2023 10:56 PM2023-02-21T22:56:58+5:302023-02-21T22:58:40+5:30
संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे तारवाशेत येथील जंगलमय पायवाटेवरून किरकोळ मासे विक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली हाेती.
सचिन माेहिते, लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे तारवाशेत येथील जंगलमय पायवाटेवरून किरकोळ मासे विक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली हाेती. हा खून असल्याचे पाेलिस तपासात उघड झाले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व संगमेश्वर पाेलिसांच्या पथकाने जयेश रमेश गमरे (२३, रा. पिरंदवणे-बाैद्धवाडी, संगमेश्वर) या तरुणाला अटक केली आहे.
ही कारवाई २१ फेब्रुवारी राेजी पहाटे ४:१० वाजता करण्यात आली. पिरंदवणे गावामध्ये सईदा रिझवान सय्यद (रा. हनुमाननगर, मधलीवाडी, ता. संगमेश्वर) ही महिला फिरून मच्छी विक्रीचा व्यवसाय करत होती. नेहमीप्रमाणे मच्छी संपवून ती घरी जात असताना तिच्यावर अज्ञाताने डोक्यावर हल्ला करून जंगलात ओढत नेले होते. तिला ठार मारून तिचा मृतदेह जंगलामध्ये काही अंतरावर नेऊन टाकला होता.
या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या गुन्ह्याची उकल करण्याकरिता संगमेश्वर पोलिस व रत्नागिरीचे स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक तयार करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच विभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने जयेश रमेश गमरे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"