तिढा सुटला; बाजारपेठांचे भवितव्य टांगणीलाच...!
By admin | Published: September 11, 2016 11:00 PM2016-09-11T23:00:40+5:302016-09-11T23:31:27+5:30
मुंबई-गोवा महामार्ग : बाधित होणाऱ्या संबंधितांना दिलासा
प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूसंपादनावरून काही शहरांमध्ये निर्माण झालेला तिढा उड्डाणपूल व ४५ मीटर रस्ता रुंदीच्या प्रस्तावामुळे सुटला आहे. खासदार विनायक राऊत यांनी तसे सांगितल्याने या प्रक्रियेत बाधित होणाऱ्या संबंधितांना दिलासा मिळाला आहे. परंतु उड्डाणपुलांमुळे महामार्गावरील वाहनांचा शहर बाजारपेठांशी असलेला संपर्क संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या बाजारपेठांचे भवितव्य टांगणीला लागल्याची चर्चा सुरू आहे.
तब्बल दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉँक्रीटीकरणातून हे चौपदरीकरण होणार आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प होत आहे. सुमारे १२ हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या या चौपदरीकरण प्रकल्पाला रुंदीकरणासाठी अधिकची जागा लागणार आहे.
त्याबाबतचे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर बाधित होणाऱ्यांच्या अनेक तक्रारी, आक्षेप पुढे आले. परिणामी चौपदरीकरण रखडणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता.
जमीनमालकांच्या तक्रारींपेक्षाही महामार्गावर असलेल्या शहरांतील मुख्य बाजारपेठा उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्त्यांची रुंदी वाढवण्यास विरोध सुरू झाला. मुख्यत्वे चिपळूण, पाली, लांजा व राजापूर येथे हा विरोध दिसून आला. चिपळूण, पाली व लांजा बाजारपेठ चौपदरीकरणात संपुष्टात येईल, अशी भूमिका व्यापारी व नागरिकांनी घेतली. त्यातून मार्ग काढण्यासाठी नंतर प्रयत्न सुरू झाले.
चिपळूणचा विषय सर्वांत प्रतिष्ठेचा करण्यात आला होता. त्यामुळे हा मोठा अडथळा दूर करण्यासाठी तेथे उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सर्वेक्षणाअंती हाच उपाय सुचविण्यात आला. आता चिपळुणात उड्डाणपूल होणार हे निश्चित झाले आहे. पाली येथून दोन महामार्ग जाणार आहेत. मुंबई-गोवा तसेच रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्ग पालीतून जाणार असल्याने तेथील बाजारपेठेचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यासाठीही विरोध दर्शविण्यात आला.
बायपास रोडचा प्रस्ताव पुढे आला. परंतु त्यामुळे बाजारपेठेचे अस्तित्त्वच संपून जाईल, असे चित्र निर्माण झाले. बाजारपेठेतूनच चौपदरीकरण करावे, परंतु कमी जागा वापरावी, असा मुद्दा पुढे आला. मात्र, आता पाली बाजारातून उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु वाहने उड्डाणपुलावरून जाणार असल्याने त्यामुळेही पाली बाजारपेठेचे महत्व कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लांजा बाजारपेठेतून मुंबई-गोवा महामार्ग जात असल्याने चौपदरीकरणात या बाजारपेठेचे मोठे नुकसान होणार होते. रुंदीकरणाच्या अटीनुसार चौपदरीकरण झाले, तर संपूर्ण बाजारपेठेवरच स्थलांतराचे संकट येणार होते. त्यामुळे लांजा बाजारपेठेतून चौपदरीकरण करताना रुंदीकरणासाठीच्या जागेची अट शिथिल करावी, अशी मागणी सुरुवातीला केली जात होती. मात्र, त्यामुळे तिढा सुटत नव्हता. अखेर लांजा बाजारपेठेतून उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजापूरचा विषय मात्र प्रलंबित आहे.
सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठेतूनही उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला आहे. वागदे व कुडाळ येथे चौपदरीकरणासाठी रस्त्याची रुंदी ६०ऐवजी ४५ मीटर्स ठेवण्याचा निर्णय झाल्याने तेथील समस्याही संपली आहे. भूसंपादनासाठी जमीन मालकांना मिळणाऱ्या भरपाई रकमेची घोषणाही लवकरच होणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा आहे.
चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी उड्डाणपुलांचा पर्याय स्वीकारणाऱ्या त्या त्या ठिकाणच्या बाजारपेठांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे.