जुने दागिने नवीन डिझाईनचे बनवण्यासाठी दिले, अन् सोनारानेच केला दागिन्यांचा अपहार
By अरुण आडिवरेकर | Published: May 31, 2023 02:13 PM2023-05-31T14:13:19+5:302023-05-31T14:16:43+5:30
चिपळूण पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल
चिपळूण : जुने दागिने नवीन डिझाईनसाठी घेतल्यानंतर सोनाराने ते परत न देता यातूनच त्या दागिन्याचा अपहार केल्याची घटना घडली आहे. ही घटना ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत चिपळूण शहरातील खेराडे कॉम्प्लेक्स येथील प्रणव गोल्ड येथे घडली. या प्रकरणी पोलीस स्थानकात रविवारी (२८ मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णेंद्र उर्फप्रणव मोंडल असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
शहरातील प्रणव गोल्ड येथे १४ ऑक्टोबर २०२२ ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत मोंडल याने एका नागरिकाचे जुने दागिने नवीन बनवून देतो, असे सांगून त्या नागरिकाचा विश्वास संपादन केला. त्यानुसार त्या नागरिकाने दीड लाख किंमतीचे जुने वापराचे सोन्याचे दागिने नवीन डिझाईनचे बनवण्यासाठी दिले. मात्र, प्रणव मोंडल याने त्या दागिन्याचे नवीन डिझाईनचे दागिने बनवले नाहीत.
त्या नागरिकाने वारंवार नवीन डिझाईनच्या दागिन्याची मागणी केली. तसेच नवीन डिझाईनचे दागिने तयार नसतील तर जुने दागिने परत द्या, असे वारंवार सांगितले. मात्र, मोंडल याने हे दागिने परत केले नाहीत. अखेर नागरिकाने पोलिस स्थानकात दागिन्यांचा अपहार केल्याची फिर्याद दाखल केली. चिपळूण पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.